Join us

पवार बोलले; विरोधकांनी सावध राहायला हवे, उद्धव ठाकरेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2018 7:29 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासहीत भाजपावर निशाणा साधला आहे.

मुंबई -  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासहीत भाजपावर निशाणा साधला आहे. देशातील सर्व राज्यांमध्ये भाजपाविरोधी पक्षांची आघाडी होणे वाटते इतके सोपे नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. यावरुन, सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. ''पवार यांच्यासारखे नेते विरोधी आघाडीत आहेतही आणि नाहीतही व हा त्यांचा नेहमीचा पायंडा आहे. ८५ वर्षांच्या देवेगौडांना आजही पंतप्रधान व्हावे असे वाटते. ममता बॅनर्जींचे तेच डावपेच आहेत. नेतृत्व आपल्याकडे नसेल तर तिसरी आघाडी ‘प्रॅक्टिकल’ नाही हे शरद पवारांचे मत. भाजपला जे बोलायचे आहे ते विरोधी पक्षांकडून वदवून घेतले जात आहे. विरोधकांना फोडून झोडून सत्ता मिळवायची असे एकंदरीत भाजपचे धोरण दिसते. शरद पवारांचा ‘सडेतोड’ बाणा त्याच पठडीतला असेल तर विरोधकांनी सावध राहायला हवे.'',अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. 

- काय आहे आजचे सामना संपादकीय?

योगी नरेंद्र मोदी यांचे ‘राजगुरू’ व देशाच्या राजकारणातील ‘महागुरू’ श्रीमान शरद पवार यांनी राष्ट्रीय राजकारणासंदर्भात काही विधाने केली आहेत. पवारांची विधाने ही स्पष्टवक्तेपणाची लक्षणे आहेत की गुरुजींच्या तोंडून ‘विद्यार्थी’ बोलले, असा गोंधळ निर्माण झाला आहे व तो गोंधळ ‘पवार पॅटर्न’ला साजेसाच आहे. २०१९ च्या निवडणुका सर्व भाजप विरोधकांनी एकत्र येऊन लढाव्यात अशा हालचाली सुरू आहेत. त्यास तिसरी आघाडी म्हणायचे की पाचवी आघाडी म्हणायचे याचा निर्णय अद्याप झालेला नाही. या आघाडीचे नेतृत्व कोणी करावे, म्हणजे आघाडीचे नेतृत्व करणाराच पंतप्रधानपदाचा उमेदवार असेल काय यावर एकमत होताना दिसत नाही. विरोधी आघाडीच्या ज्या जोरबैठका राष्ट्रीय पातळीवर सुरू असतात त्यात पवारांचाही सहभाग असतोच. निदान सगळे विरोधी मंडळ एकत्र येऊन फोटोसाठी हात वर करते. त्यात पवारांचाही हात वर झालेला आम्ही पाहतो, पण तोच हात वर ठेवून पवार आता म्हणतात, लोकसभा निवडणुकीपूर्वी तिसरी आघाडी शक्य नाही. हा प्रयोग व्यवहारी तसेच यशस्वी होणार नाही. अर्थात हे मतप्रदर्शन पवार यांच्या आतापर्यंतच्या स्वभावधर्मास धरून आहे. भारतीय जनता पक्षाचेही तेच मत आहे. एक मात्र नक्की, भारतीय जनता पक्षाला रोखायचे म्हणजे काय करायचे, हे अद्याप विरोधी आघाडीत ठरत नाही. भारतीय जनता पक्षात दाबदबावामुळे का होईना, एक सूर आहे व त्यामुळे नरडी आवळूनही मुखातून ‘मोदी मोदी’चे नारे घुमत आहेत. विरोधी आघाडीत मुक्त स्वर आहे व प्रत्येकाच्या स्वतंत्र भूमिकेमुळे कोलाहल माजला आहे. आजचे राष्ट्रीय स्तरावरील चित्र असे आहे की, भारतीय जनता पक्षाचे महत्त्वाचे साथीदार त्यांना सोडून गेले आहेत व जात राहतील.

त्यामुळे राज्याराज्यांतील प्रादेशिक पक्ष हेच २०१९ साली आपल्याला तारून नेतील याची खात्री पटल्याने भाजपने प्रादेशिक पक्षांचे उंबरठे झिजवायला सुरुवात केली. भाजप व त्यांच्या सरकारी कामांविषयी लोकांत वैफल्य व नाराजी आहे. ती वाढतच जाईल, पण विरोधकांत एकीची मूठ नसल्याने भाजपचे फावते आहे. डोंगर खोदून उंदीरदेखील निघाला नाही असा कारभार सुरू असतानाही हाती असलेली सत्ता, अफाट धनसंपत्ती व त्यातून सर्वकाही विकत घेण्याची ताकद हेच भाजपच्या यशाचे गमक आहे. त्यात त्यांना विरोधी पक्षांतील फाटाफुटीचा फायदाही मिळतो हे पवारांच्या वक्तव्याने सिद्ध झाले. तिसरी किंवा चौथी आघाडी निर्माण होईल की नाही हे आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला त्यात रसही नाही. पण भक्कम विरोधी पक्ष हा लोकशाहीस बळ देतो. त्यामुळे ही एकजूट राष्ट्रहितासाठी चांगली ठरते, पण विरोधी आघाडीची अवस्था ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी झाली आहे व आघाडीचे नेतृत्व कोणी करावे हे ठरत नाही. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, बसपाच्या मायावती, सपाचे अखिलेश यादव, द्रमुकचे स्टॅलिन, तेलगू देसमचे चंद्राबाबू, राजदचे तेजस्वी यादव, बिजू जनता दलाचे नवीन पटनायक, तेलंगणाचे के. सी. राव मंडळींनी मोट बांधली आहे. यातले किती लोक शेवटपर्यंत टिकतील? बिहार व उत्तर प्रदेशसारख्या निर्णायक राज्यांत भाजपचा पराभव होईल असे वातावरण आहे. प. बंगाल, राजस्थान, ओडिशासारखी राज्येही भाजपबरोबर जाणार नाहीत. इतर राज्यांत २०१४ चा ‘डिस्को दांडिया’ रंगणार नाही हे परखडपणे सांगायला हरकत नाही. त्यामुळे भाजपला शंभरावर जागा कमी पडल्या तर  रशियाचे पुतीन, अमेरिकेचे ट्रम्प किंवा युनायटेड अरब राष्ट्रांकडून खासदार आणायचे काय? मागच्या चार वर्षांत जनता विरोधात गेली व पुतीन, ट्रम्प मित्रवर्गात आले, पण निवडणुकांत हे कितपत चालेल? भाजपला मोदींशिवाय पर्याय नाही, पण पक्षाची विश्वासार्हता संपली.

विरोधी पक्ष डळमळीत असल्याने सगळे फावते आहे इतकेच. पवार यांच्यासारखे नेते विरोधी आघाडीत आहेतही आणि नाहीतही व हा त्यांचा नेहमीचा पायंडा आहे. ८५ वर्षांच्या देवेगौडांना आजही पंतप्रधान व्हावे असे वाटते. ममता बॅनर्जींचे तेच डावपेच आहेत. नेतृत्व आपल्याकडे नसेल तर तिसरी आघाडी ‘प्रॅक्टिकल’ नाही हे शरद पवारांचे मत. रथाला चाके नाहीत, पण पाच-दहा घोडे मात्र जुंपले आहेत. राहुल गांधी हे कुचकामी आहेत असे भाजपवाले कमी बोलतात. कारण २०१४ साली हे सर्व बोलून झाले, पण विरोधी आघाडीच्या लोकांनाच राहुल गांधी यांची भीती वाटू लागली आहे. एक सत्य इथे मान्य करावेच लागेल ते म्हणजे विरोधी आघाडीत सर्व प्रादेशिक पक्षच आहेत. काँग्रेसचे खासदार कमी. अनेक राज्यांतून सत्ता गेली तरीही काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाची लोकमान्यता आहे आणि राहुल गांधी हे देशात फिरत व बोलत आहेत. त्यामुळे काँग्रेसशिवाय विरोधकांचे महागठबंधन वगैरे होणे अशक्य आहे. मुळात काँग्रेसचे व राहुल गांधींचे करायचे काय या चक्रव्यूहात सगळे अडकले आहेत आणि राहुल गांधींचे नेतृत्व स्वीकारायचे काय? हा पेच पवारांनाही पडला असावा, पण राहुल गांधींना वगळून विरोधकांची आघाडी कशी करणार? गुजरात व कर्नाटकात राहुल गांधींचा ‘तोरा’ अगदीच वाईट नव्हता व त्यांनी श्री. मोदी व भाजपला घाम फोडला हे सत्य विरोधक जेवढे लवकर स्वीकारतील तेवढे लोकशाहीसाठी बरे होईल. भाजपला जे बोलायचे आहे ते विरोधी पक्षांकडून वदवून घेतले जात आहे. विरोधकांना फोडून झोडून सत्ता मिळवायची असे एकंदरीत भाजपचे धोरण दिसते. शरद पवारांचा ‘सडेतोड’ बाणा त्याच पठडीतला असेल तर विरोधकांनी सावध राहायला हवे.

टॅग्स :उद्धव ठाकरेभाजपाशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसनरेंद्र मोदीराजकारण