Join us

उमेदवा-यांची झूल पांघरून लांडग्यांना हत्ती म्हणून मिरवायचा खेळ सुरु, उद्धव ठाकरेंची भाजपावर सणसणीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2017 7:43 AM

नांदेडात ‘काँग्रेस’ पोटात घेऊनही विजयाचा सूर्य जन्मास आला नाही हे भांडुप विजयाचा उन्माद करणा-यांनी लक्षात घेतले पाहिजे! असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला आहे. सामना संपादकीयच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी भाजपावर सणसणीत टीका केली आहे. 

मुंबई  - फक्त उपरणी बदलून इतरांना स्वपक्षात घ्यायचे व विजय साजरे करायचे उद्योग सुरू आहेत. विरोधकांना संपविण्याची ही युक्ती आज ‘नामी’ असली तरी बेनामी संपत्तीप्रमाणे ती अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. नांदेडात ‘काँग्रेस’ पोटात घेऊनही विजयाचा सूर्य जन्मास आला नाही हे भांडुप विजयाचा उन्माद करणा-यांनी लक्षात घेतले पाहिजे! असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला आहे. सामना संपादकीयच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी भाजपावर सणसणीत टीका केली आहे. 

विरोधकांना संपविण्याची वृत्ती घातक असल्याचे मत हायकोर्टाने व्यक्त केले आहे. हायकोर्टाचे हे मत एका विशिष्ट संदर्भात असले तरी राजकारणात विरोधी सूर राहूच नये असे वातावरण देशात निर्माण केले जात आहे व त्या दिशेने पावले पडत आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच भ्रष्ट मार्गाचा अवलंब करायचा, सत्ता व पैसा त्यासाठी अशा पद्धतीने वापरायचा की, विरोधकांची कोंडीच होईल. हे वातावरण देश, लोकशाही व स्वातंत्र्याला घातक आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 

नांदेडात निवडणुकीपूर्वी शिवसेना-काँग्रेसचे नगरसेवक फोडून निवडणुकीआधीच विरोधकांना संपविल्याची आवई भारतीय जनता पक्षाने उठवली. नांदेडात वा अन्य ठिकाणी ज्या विजयाच्या ललका-या आतापर्यंत देण्यात आल्या त्यात सत्त्व किती आणि तत्त्व किती हे प्रखर तत्त्वचिंतक, पारदर्शक भाजपवाले सांगू शकतील काय? निवडणुका जिंकत असाल हो, विजयही मिळत आहेत, पण जिंकणारे शुद्ध ‘भाजप’वासी किती व बाहेरून आलेले उपरे किती? भाडोत्री माणसे सत्तेची ताकद वापरून स्वपक्षात घ्यायची व त्यांनाच उमेदवा-यांची झूल पांघरून लांडग्यांना हत्ती म्हणून मिरवायचे हा खेळ सध्या सुरू आहे अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावलं आहे. 

अगदी मुंबईतील भांडुप पोटनिवडणुकीच्या विजयानंतरही भाजपातील मंडळींना मुंबई महाराष्ट्रापासून तोडल्याचा जो आनंद झाला आहे तो विजय तरी शुद्ध भाजपचा आहे काय? काँग्रेस नगरसेविकेचे दुर्दैवाने निधन झाले, पण त्याच ‘काँगेजी’ कुटुंबास दत्तक घेऊन तुम्ही पोटनिवडणुकीत उतरलात. इतका जुनाजाणता, तत्त्ववादी, बुद्धिवंतांचा हिंदुत्ववादी पक्ष असताना तुम्हाला अशी उमेदवारांची उधारउसनवारी करून निवडणुका लढवाव्या लागत आहेत हे काही चांगले लक्षण नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.  

टॅग्स :उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसभाजपाशिवसेना