Join us  

स्वतंत्र विदर्भाचे निशाण फडकवणारी ही अवलाद कुणाची?, उद्धव ठाकरेंची सणसणीत टीका

By admin | Published: May 03, 2016 7:33 AM

महाराष्ट्राने बंडाचे स्वतंत्र निशाण फडकवून हे राज्य मागितले नव्हते, स्वतंत्र विदर्भाचे निशाण फडकविणा-या अवलादीने हे लक्षात घ्यायला हवे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 03 - महाराष्ट्र दिनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवरुन करण्यात आलेल्या आंदोलनावर शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून सणसणीत टीका केली आहे. महाराष्ट्र राज्य काळे फुगे आकाशात सोडून निर्माण झाले नाही, तर पंडित नेहरूंसारख्या शक्तिमान नेत्यांच्या मोटारींपुढे आडवे पडून, प्रतापगडावर त्यांना काळे झेंडे दाखवून आणि पोलिसांच्या लाठ्या व गोळ्या खाऊन निर्माण झाले आहे. पुन्हा हे सर्व करताना आंदोलकांच्या हातात हिंदुस्थानचाच तिरंगा होता. महाराष्ट्राने बंडाचे स्वतंत्र निशाण फडकवून हे राज्य मागितले नव्हते. स्वतंत्र विदर्भाचे निशाण फडकविणार्‍या अवलादीने हे लक्षात घ्यायला हवे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. 
 
विदर्भाला बदनाम करण्याचे हे राष्ट्रद्रोही कारस्थान आहे. ते उधळून लावलेच पाहिजे. नागपुरात काही मंडळींनी एकत्र येऊन वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकवला व काळ्या रंगाचे फुगे आकाशात सोडले. त्यानंतर बाजूच्या रसोईत जाऊन सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला, पण अशा नवथर मंडळींकडे फारसे लक्ष न देता महाराष्ट्रीय जनतेने आपली घोडदौड सुरू ठेवली पाहिजे असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे. 
 
हिंदुस्थान हे एक सार्वभौम असे स्वतंत्र राष्ट्र आहे व अनेक संघराज्यांचे मिळून ते बनले आहे. ही राज्ये म्हणजे स्वतंत्र राष्टे्र नाहीत. त्यामुळे कोणत्याही राज्याचा स्वतंत्र ध्वज व स्वतंत्र संविधान असूच शकत नाही. सगळ्यांचा ध्वज एकच तो म्हणजे तिरंगा. असे असताना तथाकथित विदर्भवाद्यांनी विदर्भ राज्याचा स्वतंत्र ध्वज फडकवून देशाच्या घटनेशी व तिरंग्याशी द्रोहच केला आहे आणि हा द्रोह केल्यानेच तो खर्‍या अर्थाने काळा दिवस ठरला असे आम्ही मानतो असंही उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
विदर्भातील ज्या लोकांनी आता स्वतंत्र निशाण फडकवले त्यावरून त्यांच्या डोक्यात काय कचरा भरला आहे याची कल्पना येते. देशासाठी हा खरा धोका आहे. अशा लोकांमुळेच देशाच्या अखंडतेचे वाटोळे होत असते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नागपुरातील हा तमाशा उघड्या डोळ्यांनीं बघत राहिले. निदान या नालायकी प्रवृत्तीचा धिक्कार करण्याची भूमिका भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी व इतर मंत्र्यांनी घ्यायला हवीच होती. कोणत्या नियमाने तुम्ही स्वतंत्र निशाण फडकवीत आहात असा साधा प्रश्‍न विचारण्याची हिंमत दाखवायला हवी अशी टीका उद्धव ठाकरे यांनी आपला मित्रपक्ष भाजपावर केली आहे.  
 
माओवादी, नक्षलवादी, तोयबा, अल कायदा हे त्यांचे स्वतंत्र निशाण फडकवीत असतात, कारण ते राजद्रोही आहेत. देशाची घटना ते मानत नाहीत. तेव्हा हे जे कोणी स्वत:ला विदर्भवादी वगैरे म्हणवून घेतात त्यांना स्वत:ला याच रांगेत बसायचे आहे काय? . हुतात्म्यांचा सन्मान करणे हे महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांचे कर्तव्यच ठरते. हे कर्तव्य कुणी जाणीवपूर्वक नाकारले असेल तर हुतात्म्यांच्या शापाने त्यांचे तळपट झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र दिनाचा एक शासकीय सोहळा यापुढे नागपुरातही व्हायला हवा असंही उद्धव ठाकरे बोलले आहेत.