मुंबई - राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपा आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं महायुतीचं सरकार स्थापन केलं. शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदेंनी भाजपासोबत हातमिळवणी केली. त्यानंतर, अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर तेही महायुतीत सहभागी झाले. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखीत, मी पुन्हा आलो तेही दोन पक्ष फोडून आलो, असे विधान केले होते. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या या विधानावरुन शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.
शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादीचे अजित पवार हे महायुतीत सहभागी झाले आणि आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भाजपासोबत हातमिळवणी करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. या सर्वच राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू म्हणून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे, अनेकदा फडणवीसांवर फोडाफोडीच्या राजकारणाचा आरोपही करण्यात येतो. त्यातच, एका मुलाखतीत बोलताना, मी पुन्हा आलो, तेही दोन पक्ष फोडून आलो, असे फडणवीसांनी म्हटले होते. त्यांच्या याच विधानाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला.
देवेंद्रजी, देशाच्या राजकारणाच्या इतिहासात तुमचं नाव ‘उत्तम घरफोड्या’ असं झाल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर बोचरी टीका केली. तर, ‘मी दोन पक्ष फोडले’ सांगून फडणवीसांनी मिध्यांचं ‘हिंदुत्वासाठी पक्ष सोडला’ हे भांडं फोडलं, असे म्हणत एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला.
भाजपाला घरफोडीचं लायसन्स द्या
"शिवसेनेचं प्रेम आणि मिंध्यांचं भाडोत्री प्रेम यात जमीन आस्मानाचा फरक आहे. शिवसेना हा एक निखारा आहे. शिवसेना कळणं हे येड्यागबाळ्याचं काम नाही. भाजपला घरफोडीचं एक लायसन्स द्या, आणि पक्ष चिन्ह कमळ सोडून हातोडा द्या," असा घणाघातही उद्धव ठाकरेंनी केला. तसंच आता अच्छे दिन नाही, सच्चे दिन येणार, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.