इतरांच्या खुर्च्यांना टेकू देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 07:40 AM2018-11-01T07:40:11+5:302018-11-01T07:40:28+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं आहे.
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं आहे. ''मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे यांना आता चौथ्या वर्षी जो शिवसेनाप्रेमाचा पान्हा फुटला आहे तो काही उगाच नाही. कारण इतरांच्या बाबतीत सोळावं वरीस धोक्याचं असेल, पण फडणवीस व त्यांच्या सरकारसाठी पाचवं वरीस धोक्याचं ठरेल असा माहौल स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आम्ही काय करायचे, कोणत्या दिशेने जायचे ते आम्हीच ठरवू. चकव्यांच्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज नाही'', असा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल चढवला आहे.
सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे
- महाराष्ट्राचे चकचकीत आणि टकटकीत मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचा महिमा काय वर्णावा? तो अद्भुतच आहे. त्यांच्या कारकीर्दीस चार वर्षे झाली. त्यामुळे प्रथा-परंपरेनुसार त्यांनी मुलाखती वगैरे देऊन आपले मन मोकळे केले आहे. दिवाळीच्या आधीच मुख्यमंत्र्यांनी काही आपटी बार फोडले आहेत.
- चार वर्षांत जनतेने बरेच काही सोसले व भोगले असले तरी मुख्यमंत्र्यांचा काळ तसा सुखाचा गेला. फार संघर्ष, कष्टाचे जीवन त्यांच्या नशिबी आले असे झाले नाही. त्यांचे हेलिकॉप्टर अनेकदा भरकटले, पण शेवटी त्या बेधुंद वादळातही त्या उडनखटोल्याची चाके जमिनीस लागली हे त्यांचे आणि महाराष्ट्राचे भाग्यच म्हणावे लागेल.
- मुख्यमंत्र्यांनी दावा केला की, चार वर्षांत महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर नेले. पहिला क्रमांक त्यांनी नेमका कोणत्या विषयात मिळवला? महागाई, बेरोजगारी, ढिसाळ कारभार की आणखी कशात? चार वर्षे होत असताना शिवस्मारकाच्या पायाभरणीस निघालेली बोट बुडाली. हा काही शुभ संकेत नाही. कुपोषणाचा आकडा महाराष्ट्रात वाढतोच आहे. भीमा-कोरेगाव दंगल, मराठा आरक्षणासाठी निघालेले मोर्चे या सामाजिक अशांततेचे श्रेय कोण घेणार?
- मुख्यमंत्र्यांनी चौथ्या वर्षी मैत्रीचा, युतीचा सूर लावला आहे. फडणवीस म्हणतात, काही झाले तरी युती होईल. जागा वाटपावर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. श्रीमान फडणवीस यांनी असेही सांगितले की, हिंदुत्ववादी मतांची विभागणी होऊ नये म्हणून युती अतिशय आवश्यक आहे. शाब्बास! शाब्बास देवेंद्रजी! अब आया उंट पहाड के निचे, असे आम्ही मानावे काय? शिवसेना पक्षाच्या चाव्या नरीमन पॉइंटच्या भाजप कार्यालयात नसून लाखो कडवट शिवसैनिकांच्या हाती आहेत. आम्ही त्यांचे नेतृत्व करीत आहोत.
- दोन वर्षांपूर्वी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ‘स्वबळा’वर लढून महाराष्ट्राची सत्ता मिळवण्याचा एक ठराव एकमताने मंजूर झाला. शिवसेनेचा ठराव म्हणजे बेडकी डराव नाही. मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे यांना आता चौथ्या वर्षी जो शिवसेनाप्रेमाचा पान्हा फुटला आहे तो काही उगाच नाही. कारण इतरांच्या बाबतीत सोळावं वरीस धोक्याचं असेल, पण फडणवीस व त्यांच्या सरकारसाठी पाचवं वरीस धोक्याचं ठरेल असा माहौल स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आम्ही काय करायचे, कोणत्या दिशेने जायचे ते आम्हीच ठरवू. चकव्यांच्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज नाही.
- हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होऊ नये वगैरे दाखले आज दिले जात आहेत. मग 2014 साली हा हिंदुत्ववाद व मतविभाजनाचा विचार कोणत्या कनवटीस खोचून ठेवला होता? शिवसेना हा भाजपचा नैसर्गिक मित्र असल्याचे ‘रक्तगट’ दाखवले जात आहेत. मग 2014 साली नक्की कुणाच्या रक्तात भेसळ झाली होती?
- कंसाला, रावणाला, अफझल खानाला ज्या ‘मी’पणाच्या अहंकाराने ग्रासले होते त्याच शिवसेनाद्वेषाचा व अहंकाराचा थयथयाट गेली चार वर्षे दिल्लीपासून मुंबईपर्यंत सुरू होता. आम्ही त्या वादळातही आमचा संयम ढळू दिला नाही. त्यामुळे शिवसेना अभेद्यच राहिली, पण ज्यांचे गॅसचे फुगे चार वर्षांपूर्वी हवेत गेले होते, त्या फुग्यांना टाचणी लागून ते खाली आले.
- शिवसेनेस कधी विजयाचा उन्माद चढला नाही आणि पराभवाने खचली नाही. जमिनीवर चालायचे असते, उडायचे नसते हाच आमचा मंत्र आहे. चार वर्षांत शिवसेनेला बरेच काही शिकता आले. हीच शिदोरी घेऊन आम्ही पुढे जात आहोत. शिवसेना नाराज आहे, मग सत्तेतून बाहेर का पडत नाही? असे प्रश्न विचारले जातात.
- शिवसेना नाराज नाही असे परस्पर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. ज्या आमच्या टेकूवर त्यांची खुर्ची टिकून आहे त्या टेकूसाठी त्यांचे हे विधान आहे. त्यांना पाचवे वर्ष ढकलायचे आहे. आम्हाला शिवसेना आणि महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे. इतरांच्या खुर्च्यांना टेकू देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही. देवेंद्रजी, शिवसेनेच्या राजी-नाराजीची चिंता तुम्ही करू नका. महाराष्ट्राची जनता नाराज आहे. त्याची चिंता करा.