अदानी उद्योग समुहाकडून होणाऱ्या धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाने महामोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चामध्ये शिवसैनिकांसह महाविकास आघाडी आणि इतर पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, हा मोर्चा संपल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी अदानी आणि राज्यातील सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली. ज्यांनी ज्यांनी अदानींची सुपारी घेतली आहे त्यांनी आजच्या मोर्चातील हा अडकित्ता, खलबत्ता लक्षात घ्यावा. या खलबत्त्यात यांना असं चेचून काढू की, पुन्हा अदानींचं नाव काढणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
महामोर्चा समाप्त झाल्यानंतर उपरस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प नुसता चर्चेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्नासाठी अनेकजण आवाज उठवत आहेत. यात शिवसैनिकांचाही समावेश आहे. मी त्यांना आश्वासन दिलं होतं की, धारावीसाठी गरज पडली तर मुंबईत काय अख्या महाराष्ट्र उतरवेन. आज मुंबईतील मोजके कार्यकर्तेच रस्त्यावर आले आहेत. ज्यांनी ज्यांनी अदानींची सुपारी घेतली आहे. त्यांनी हा अडकित्ता लक्षात घ्यावा, हा अडकित्ता आहे. खलबत्ता आहे. त्यात चेचून काढू. पुन्हा अदानीचं नाव काढणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले.
ते पुढे म्हणाले की, आता यांना पन्नास खोके कमी पडायला लागले. म्हणून हे बोके धारावी आणि मुंबई गिळायला निघाले आहे. यांची मस्ती वाढत चालली आहे. मध्यंतरी सरकार आपल्या दारीची चर्चा सुरू होती. मात्र हे सरकार अदानीच्या दारी उतरलं आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.