तानाजी सावंतांना शिवसेनेचा 'जय महाराष्ट्र', उद्धव ठाकरेंसोबत उडाले खटके?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 02:53 PM2020-01-01T14:53:21+5:302020-01-01T14:53:57+5:30

युती सरकारमध्ये जलसंधारण मंत्री असलेले तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात तिवरे धरण फुटले होते.

Uddhav Thackeray's 'Jai Maharashtra' to Tanaji Sawant , Shiv Sena confict in pary | तानाजी सावंतांना शिवसेनेचा 'जय महाराष्ट्र', उद्धव ठाकरेंसोबत उडाले खटके?

तानाजी सावंतांना शिवसेनेचा 'जय महाराष्ट्र', उद्धव ठाकरेंसोबत उडाले खटके?

Next

मुंबई - महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार असलेले तानाजी सावंत यांना पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून डावलण्यात आले आहे. सावंत यांचा युती सरकारमधील मंत्रीपदाचा कार्यकाळ काहीचा वादग्रस्त राहिल्यामुळे त्यांची मंत्रीपदाची संधी हुकली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर, तानाजी सावंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली, पण तिथंही त्यांच्या पदरी निराशाच पडल्याची माहिती आहे.  

युती सरकारमध्ये जलसंधारण मंत्री असलेले तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात तिवरे धरण फुटले होते. त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. खेकड्यांनी पोखरल्यामुळे धरण फुटल्याची अजब प्रतिक्रिया सावंत यांनी त्यावेळी दिली होती. या वक्तव्यामुळे ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले होते. या व्यतिरिक्त महाराष्ट्राला भिकेला लावेल, असं वक्तव्यही सावंत यांनी केलं होतं. त्यावरुनही विरोधकांनी मोठी टीका केली होती. कदाचित याच बाबी लक्षात घेऊन शिवसेनेनं तानाजी सावंतांना डावलल्याची चर्चा आहे. मात्र, त्यानंतरही तानाजी सावंत आणि उद्धव ठाकरेंमध्ये खटके उडाल्याची चर्चा आहे. 
आमदार तानाजी सावंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची घेतली. तसेच, आपणास डावलण्याचे कारणही विचारले. मात्र, उद्धव ठाकरेंच्या उत्तराने त्यांचं समाधान झालं नाही. त्यामुळे, यापुढे मी मंत्रिपदासाठी कधीही मातोश्रीवर येणार नाही, असे सावंत यांनी म्हटले. सावंतांचा हा तोरा पाहून उद्धव ठाकरेंनीही ठाकरे शैलीत 'जय महाराष्ट्र' म्हणत त्यांना निरोप दिला, असे वृत्त एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिले आहे. त्यामुळे सावंत आणि ठाकरेंमध्ये खटके उडाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, सोलापूरमध्ये शिवसेना नेत्यांनी बैठक घेतली. त्यामध्ये उद्धव ठाकरेंकडे सावंत यांच्या मंत्रिपदासाठी साकडे घालण्याचं ठरवल्याचं बार्शीतील शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी म्हटलं आहे. 
दरम्यान, विधानसभा निवडणुकांवेळी सावंत यांच्यावर शिवसेनेने मोठी जबाबदारी टाकली होती. अनेक उमेदवाऱ्या त्यांनी निश्चित केल्या होत्या. तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांची उमेदवारी कापण्यासाठी सावंत यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या रश्मी बागल यांना उमेदवारी देखील मिळवून दिली. मात्र रश्मी बागल यांच्यापेक्षा 20 हजार अधिक मते पाटील यांना मिळाले. त्यामुळे शिवसेनेचे एका जागेचे नुकसान झाले हे स्पष्ट होते. किंबहुना यामुळे शिवसेनेने सावंत यांना मंत्रीपदापासून दूर केले, की खेकड्यांच्या वक्तव्यामुळे डावलले याचा अद्याप उलगडा होऊ शकला नाही. 

 

Web Title: Uddhav Thackeray's 'Jai Maharashtra' to Tanaji Sawant , Shiv Sena confict in pary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.