Join us  

उद्धव ठाकरेंची मानसिकता ढळली आहे, मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 11:26 AM

पलटवार : कंटेनरमधले खोके कुणाकडे जातात, हे सर्व महाराष्ट्राला ठाऊक

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : उद्धव ठाकरेंची मानसिकता ढळली आहे, नैराश्यातून ते आमच्यावर टीका करत आहेत, असे सांगत उद्धव ठाकरेंनी बुलढाण्याच्या सभेत केलेल्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे. उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या गुवाहाटी दौऱ्यावर भाषणात टीका केली होती. त्याबाबत माध्यमांनी विचारले असताना, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, त्यांच्याकडून आणखीन काय अपेक्षा करणार. त्यांची मानसिकता ढळली आहे. नैराश्यातून अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत. त्यांना नैराश्य यायला फार वेळ लागेल, असे मला वाटत होते, पण ते लवकर आले, असा टोलाही शिंदे यांनी लगावला. 

खोक्यांवरून उद्धव ठाकरेंकडून केल्या जाणाऱ्या आरोपांनाही शिंदेंनी उत्तर दिले. दीपक केसरकरांनी एक विधान केले आहे. ते बोध घेण्यासारखे आहे. फ्रीजमध्ये भरून कुठे खोके गेले, असे केसरकर म्हणाले आहेत. मोठे खोके घेण्याची ऐपत आमदारांची आहे का? फ्रीजएवढ्या कंटेनरमधले खोके कुणाकडे जातात आणि ते कोण पचवू शकते, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. एक दिवस हे सगळे जनतेच्या समोर येईल. केसरकरांनी हे सूचक विधान केले असल्याचे शिंदे म्हणाले. आम्ही सरकार बनविल्यानंतर राज्यात सकारात्मकता तयार झाली आहे. त्यामुळेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांच्या छातीत धडकी भरली आहे. त्यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. त्यामुळे त्या धक्क्यातून ते सावरलेले नाहीत, असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

सरमा यांनाही ‘झाडी... डोंगार’ची पडली भुरळकाय झाडी.. काय डोंगरा.. काय हॉटील.. या वाक्याची महती सरमा यांचाही कानावर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या वेळी आलेली होती. या भेटीचे निमित्त साधून आमदार शहाजीबापू पाटील यांनी खुद्द आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा याना त्यांचा हा डायलॉग खास आपल्या शैलीत ऐकवला.

‘आसाम भवन महाराष्ट्रात, तर महाराष्ट्र भवन आसाममध्ये’

मुंबई : आसाममध्ये महाराष्ट्र भवन आणि महाराष्ट्रात आसाम भवन उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये सदिच्छा भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र आणि आसाम राज्यामध्ये परस्पर संबंध अधिक दृढ व्हावेत तसेच या दोन राज्यात उद्योग, व्यापार, पर्यटनात वाढ व्हावी यावर चर्चा करण्यात आली. यावेळी शिंदेंनी ही घोषणा केली.

मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदार, खासदारांच्या गुवाहाटी दौऱ्याची सर्व व्यवस्था आसाम सरकारने केली होती. आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी या सर्वांसाठी रविवारी सहभोजनाचे आयोजन केले होते.  

सत्ता बदलाच्या काळात सलग शिंदे समर्थक आमदारांसह ११ दिवस गुवाहाटीमध्ये होतो. याबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, तेव्हा सगळ्यांच्या मनावर प्रचंड दडपण होते, मात्र आता हे दडपण दूर झाले असून तेव्हा ज्या कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते, त्याच कामाख्या देवीचे मुख्यमंत्री बनून पुन्हा दर्शन घेताना एक वेगळेच समाधान मिळाले.

महाराष्ट्रातील सत्ता बदलाच्या काळात केलेल्या मदतीबद्दल आभार मानताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांना खास गणपतीची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच एकदा महाराष्ट्राचा पाहुणचार स्वीकारण्यासाठी सरमा यांनी नक्की यावे असे त्यांना महाराष्ट्र भेटीचे निमंत्रणही दिले. सत्तासंघर्षाच्या काळात सहाय्य करणाऱ्या आसाम सरकारमधील मंत्री आणि पोलीस अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

 

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेशिवसेना