मुंबई - शिवतीर्थावर महाविकास आघाडीचा शपथविधी सोहळा सुरू असताना या सोहळ्याची शोभा वाढविण्यासाठी ग्रहांचीही मांदियाळी दिसत होती. गुरुवारी सूर्यास्तानंतर गुरू व चंद्र यांची पिधान युती आकाशात दिसत होती, अशी माहिती पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. या वेळी, तेजस्वी शुक्र ग्रहही दिसत होता. शपथविधी सोहळ्याला आकाशातून गुरू, शुक्र व चंद्र यांनी हजेरी लावून या सोहळ्याला जणू चारचाँद लावले. सायंकाळी ७ वाजून ४३ मिनिटांपर्यंत हे दृश्य दिसत होते. पुढील काही दिवस पश्चिम क्षितिजावर गुरू, शुक्र आणि चंद्र यांचे दर्शन होत राहणार आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवण्याचं शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आज त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी पूर्ण करून दाखवलंच; पण राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुराही स्वतःच्या खांद्यावर घेत त्यांनी शिवसेनेच्या सोनेरी इतिहासात नवा अध्याय रचला आहे. ज्या शिवाजी पार्क मैदानात बाळासाहेबांनी शिवसेनेचं रोप रुजवलं आणि वाढवलं, त्याच शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.