उद्धव ठाकरेंचा आदेश, गजानन किर्तीकर यांची 'शिवसेना नेते' पदावरुन हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 11:00 PM2022-11-11T23:00:40+5:302022-11-11T23:01:44+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेण्यासाठी गजानन किर्तीकर आले होते.
मुंबई - बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात गेले आहेत. त्यातच, गेल्या काही दिवसांपासून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात सामील होण्याची चर्चा रंगली होती. अखेर किर्तीकर यांचा शिंदे गटात प्रवेश झाला. त्यामुळे, शिंदे गटातील खासदारांची संख्या आता १३ वर पोहोचली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी गळाभेट घेत त्यांचे पक्षात स्वागत केले. या पक्षप्रवेशानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून गजानन किर्तीकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेण्यासाठी गजानन किर्तीकर आले होते. त्यानंतर, मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी रामदास कदम यांना जादू की झप्पी देत दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी आनंद व्यक्त केला. या प्रवेशामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील शिवसेना नेते पदावरुन गजानन किर्तीकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आल्याचे पत्र प्रसिद्धीसाठी देण्यात आले आहे. त्यावर, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांची सही आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे ही हकालपट्टी करण्यात येत असल्याचं या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आलेल्या पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातही खासदार किर्तीकर यांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली होती. तसेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जायला नको, असेही ते म्हणाले होते. आज एकीकडे आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी होताच, इकडे किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.