मुंबई : लोकसभा, विधानसभा निवडणूक वर्षभरावर आलेली असताना शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विधानावरून बुधवारी स्पष्ट झाले. आम्ही सत्तेत राहून जनतेच्या भल्याकरिता विरोधी पक्षापेक्षा जास्त कणखर भूमिका मांडत आहोत, असे ठाकरे यांनी सांगितले.सरकारमधून बाहेर पडण्याच्या गोष्टी करीत असताना महामंडळे कशी स्वीकारली, असे विचारले असता ठाकरे म्हणाले, दीड-दोन वर्षांपूर्वी यादी दिली होती. आता आम्हाला काहीही नको. शिवसेनेच्या वतीने रंगशारदा येथे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यात पक्षांतर्गत आढावा घेतला. राज्यात शिवसेनेची स्थिती काय, स्वबळावर लढल्यास काय अडचणी येऊ शकतात, आदींवर चर्चा झाली. ते पत्रकारांशीही बोलले. नोटाबंदी फसली असे मी दोन वर्षांपूर्वीच म्हटले होते. रिझर्व्ह बँकेला ते आता कळले. नोटाबंदीमुळे रोजगार गेले, मृत्यू झाले त्याची जबाबदारी कोणावर, असा सवाल ठाकरे यांनी एका प्रश्नावर केला.हार्दिक पटेलना फोनगुजरातेत पटेल आरक्षणासाठी बेमुदत उपोषण करीत असलेले हार्दिक पटेल यांना उद्धव ठाकरे यांनी बुधवारी फोन केला. ‘गुजरात आणि समाजाला तुझी गरज आहे. उपोषणाने आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. ज्यांच्यासमोर उपोषण करतो त्यांना संवेदना असली पाहिजे, असे हार्दिकला सांगितल्याचे ते म्हणाले. अतिरेकी, पाकिस्तानशी बोलण्यापेक्षा देशातील तरुणांशी संवाद करून प्रश्न सोडवा, असा टोला त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे नाव न घेता हाणला.
सत्तेत राहूनही निभावणार विरोधी पक्षाची भूमिका, सत्तेतून बाहेर पडण्याबाबत उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 2:55 AM