राज ठाकरेंच्या आवाहनाला उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 01:53 AM2020-04-17T01:53:27+5:302020-04-17T01:53:42+5:30
शासनाकडून तत्परतेने सकारात्मक आकडेवारी जारी
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन करावे आणि प्रशासनाने तत्परतेने त्याबाबत कार्यवाही करावी, अशी घटना आज समोर आली आहे. राज यांनी कालच मुख्यमंत्री उद्धव यांच्याशी फोनवर चर्चा केली. या वेळी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ठणठणीत बरे झालेल्या रुग्णांची आकडेवारी कोणतेच सरकार जारी करीत नाही. दिलासादायक आकडेवारीही समोर यायला हवी, अशी भूमिका राज यांनी मांडली. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनीही याची दखल घेतली. आणि आज प्रशासनाकडून ठणठणीत बरे झालेल्या रुग्णांची विस्तृत आकडेवारी जारी करण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने लोकांना सोशल मीडियातून संबोधित करीत दिलासा देत आहेत. अलीकडेच फेसबुकच्या माध्यमातून राज्याला संबोधित करताना, कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात राजही माझ्यासोबत असल्याचे विधान मुख्यमंत्री उद्धव यांनी केले होते. दोन्ही नेत्यांमध्ये वेळोवेळी चर्चाही होत असल्याचे सांगितले जात होते. त्यातच राज यांनी केलेल्या आवाहनाला मुख्यमंत्री ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि तातडीने अंमलबजावणी होईल याची दक्षता घेतल्याचे दिसून आले.
कोरोनाबाबत प्रशासनाकडून विविध आकडेवारी जारी केली जात असे. मात्र, यात बरे झालेल्या रुग्णांची एकत्रित माहिती अथवा याबाबतच्या सकारात्मक घटनांचा उल्लेख नसे. परंतु, आज याबाबच्या आकडेवारीसह ‘आनंदाची बातमी’ या मथळ्याखाली दिलासादायक प्रसिद्धिपत्रक जारी केले. कोरोनाच्या या लढाईत पक्षीय राजकारण आणि भेद बाजूला ठेवले जात आहेत. योग्य सूचना केल्या जात असून त्याची दखलही घेतली जात असल्याचे यानिमित्ताने समोर आले.
लोक लॉकडाउनचे पालन करतील
राज ठाकरे म्हणाले की, या आजारावर मात करून हजारो बाहेर पडलेत हे दिलासादायक आहे. याबाबतच्या बातम्या दिल्यास आजार नियंत्रणात आहे असे वाटून लोक लगेच बाहेर पडतील, असा जर प्रशासनाचा समज असेल तर तो चुकीचा आहे. ३ मेपर्यंतच्या लॉकडाउनचे लोक पालन करतील यात शंका नाही.