मुंबई - गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींदरम्यान, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील बंडाला पाठबळ देत भाजपाने शिवसेनेत मोठी फूट पाडली होती. त्यानंतर शिवसेनेतील आमदारांपाठोपाठ, खासदार आणि आजी-माजी नगरसेवकही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील गटात दाखल झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी घराणेशाहीमुळे शिवसेनेसारखे प्रादेशिक पक्ष संपत जातील आणि एकटा भाजपा उरेल, असे विधान केले होते. नड्डा यांच्या या विधानाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाच्या अध्यक्षांनी शिवसेना हा संपत चाललेला पक्ष आहे, असं म्हटलंय. पण त्यांना माहिती नाही की, शिवसेनेनं अशी आव्हानं पायदळी तुडवत त्यावर झेंडा रोवलाय, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
आज मातोश्रीबाहेर जमलेल्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. त्यावेळी ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून रोज लढाया सुरू आहेत. आपली लढाई दोन तीन पाळीवर सुरू आहे. एक रस्त्यावरील लढाई आहे, त्यात आपण कमी पडणार नाही. दुसरी लढाई कोर्टात सुरू आहे आणि तिसरी लढाई ही तेवढीच महत्वाची आहे. ती लढाई म्हणजे कागदाची. शपथपत्र गोळा करा. हा विषय खूप गंभीर आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, कायद्याची लढाई सुरू आहे. ती लढाई आपले वकील किल्ला लढवताहेत लढवताहेत. माझा न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे. आजपर्यंत शिवसेनेला फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र आता शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. हे मी आधीच बोललो होतो की, हा प्रयत्न शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न आहे. परवा भाजपाच्या अध्यक्षांनी ते बोलून दाखवले. शिवसेना हा संपत चाललेला पक्ष आहे, असे ते म्हणाले. पण त्यांना माहिती नाही की, शिवसेनेनं अशी आव्हानं पायदळी तुडवत त्यावर झेंडा रोवलाय, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
ठीक आहे राजकारणात हार जीत होत असते. कधी कोण जिंकत असतात. तर कुणी पराभूत होत असतो. पण कुणी कुणाला संपवण्याची भाषा आपल्या देशात झाली नव्हती. दुसऱ्याला संपवण्याची भाषा करतो तो संपतो, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.