मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सामनाला दिलेल्या मुलाखतीमधून राज्यात झालेल्या सत्तांतरासाठी कारणीभूत ठरलेले शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजपावर सडकून टीका केली होती. भाजपा शिवसेना आणि ठाकरे यांना वेगळा करण्याचा डाव खेळत आहे. सत्तांतरासाठी हजारो कोटी खर्च केले गेले. सध्या राज्यात हम तूम एक कमरेमे बंद हो, असं सरकार चालू आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी संक्षिप्त प्रतिक्रिया दिली आहे. मी फिक्स मॅच पाहत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांनी आजच्या मुलाखतीमधून राज्यातील सरकार आणि भाजपावर टीका केली आहे, त्याबाबत काय म्हणाल, असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी फिक्स मॅच पाहत नाही. मी लाईव्ह मॅच पाहतो. खरी मॅच बघतो. ही मुलाखत म्हणजे फिक्स मॅच आहे, ती पाहून त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची? काही दिवसांनी सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील तेव्हा प्रतिक्रिया देऊ, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराजांच्या वढू येथील नियोजित स्मारकाला स्थगिती दिल्याचा केलेला आरोप फेटाळून लावला. ते म्हणाले की, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वढू येथील संभाजी महाराजांच्या स्मारकासंदर्भातील कामांना आमच्या सरकारने स्थगिती दिल्याचा आरोप केला आहे. दादांसारख्या माणसाने असा आरोप करताना फाईलवर काय लिहिलंय हे पाहिलं पाहिजे होतं. मी स्वत:च्या हस्ताक्षरात फाईलवर लिहिलंय की, या कामाला स्थगिती देणं योग्य होणार नाही. उलट या संदर्भात काय काय कामं घेतली आहेत. त्यासंदर्भातील सादरीकरण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर करावं. त्यात काही कामं राहिली असतील तर त्याचाही समावेश करण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.