शिवसेनेची ताकद वाढली, अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आणखी एका पक्षाचा पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 09:07 AM2022-10-13T09:07:55+5:302022-10-13T09:09:18+5:30
अंधेरी पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवाराला राष्ट्रवादी पाठिंबा देणार आहे, अस राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे.
मुंबई - आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मुंबईतील अंधेरी पूर्व या विधानसभा निवडणुकीसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत फुटीनंतर पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. त्यामुळे, ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी पहिली परीक्षा मानली जात आहे. एकीकडे भाजप आणि दुसरीकडे शिवसेनेतून फुटलेला शिंदे गट उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. येथील शिवसेना उमेदवार ऋुतुजा लटके यांचा राजीनामा अद्याप मंजूर झाला नाही. मात्र, दुसरीकडे शिवसेनेला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीनंतर आता भाकपनेही शिवसेना उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवाराला राष्ट्रवादी पाठिंबा देणार आहे, अस राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे. तर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही अंधेरी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा पूर्णपणे पाठिंबा शिवसेना उमेदवाराला असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे, शिवसेनेला मोठं समर्थन मिळालं आहे. त्यातच, गेल्या ५० वर्षांपासून शिवसेनेच्या विरोधात असलेल्या भाकपनेही जाहीर अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. भाकपचे मुंबई सचिव कॉ. मिलिंद रानडे, कॉ. प्रकाश रेड्डी, प्रकाश नार्वेकर, बाबा सावंत, व्यापारी संघटनेचे नेते विजय दळवी आणि बबली रावत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन अंधेरी पोटनिवडणुकीतील शिवसेना उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांना पाठींबा जाहीर केला, अशी माहिती शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे.
भाकपचे मुंबई सचिव कॉ. मिलिंद रानडे, कॉ. प्रकाश रेड्डी, प्रकाश नार्वेकर, बाबा सावंत, व्यापारी संघटनेचे नेते विजय दळवी आणि बबली रावत यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन अंधेरी पोटनिवडणुकीतील शिवसेना उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांना पाठींबा जाहीर केला. pic.twitter.com/DWZCcbONpn
— Shivsena Communication (@ShivsenaComms) October 12, 2022
लालबाग-परळमधील शिवसेनेचे वर्चस्व हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी संघर्ष करूनच वाढले होते. गिरणगावात भाकपचे असलेले वर्चस्व आमदार कृष्णा देसाई यांच्या खुनानंतर व परळमधील भाकपच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्यानंतर ओसरू लागले. भाकपच्या जागी शिवसेनेचा भगवा इथे फडकू लागला होता. देसाईंच्या हत्येमागे शिवसेना असल्याचा आरोप कम्युनिस्ट नेत्यांनी केला होता. मात्र, तो न्यायालयात टिकला नाही. त्यानंतर गेली पाच दशके शिवसेना हा मुख्य शत्रू मानणाऱ्या भाकपने आता देशातील मुख्य शत्रू भाजप असून, शिवसेना भाजपविरोधात उभी ठाकल्यामुळे त्यांना समर्थन देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याचे कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.
गांधीजींच्या नातवानेही घेतली उद्धव ठाकरेंची भेट
महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनीही आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत नफरत छोडो, संविधान बचाओ अभियानाचे राष्ट्रीय संयोजक फिरोझ मिठीबोरवाला, आमदार मनीषा कायंदे उपस्थित होते. लोकशाही आणि देश वाचवण्यासाठी शिवसेनेनेही या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी तुषार गांधी यांनी केले. उद्धव ठाकरे यांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.