मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही नेत्याचे भाषण झाले नाही. त्याऐवजी मुंबईसाठी शिवसेनेने काय करून दाखवले, याची चित्रफीत दाखवण्यात आली. स्वत: ठाकरे यांनीही मुंबईत सरकार काय-काय उभारणार, याची माहिती देत पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या महापालिका निवडणुकीचे एकप्रकारे रणशिंग फुंकले.महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी तयार केलेली चित्रफीत दाखवून यावेळी मुंबईसाठी शिवसेनेने केलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडण्यात आला. उद्धव ठाकरे म्हणाले की, दक्षिण मुंबईत दिमाखदार असे मराठी भाषा भवन आमचे सरकार बांधणार आहे. मराठी नाटकांचा इतिहास सांगणारे रंगभूमी दालनही उभारले जाईल. धारावीतील झोपडीवासीयांचे पुनर्वसन तर नक्कीच करू, पण तिथे जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्रही उभारले जाईल. वरळीत जागतिक दर्जाचे मत्स्यालय बांधले जाईल. लष्कराचे एक संग्रहालयही मुंबईत उभारले जाणार आहे.
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रशंसानगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवरात्रातील नऊ दिवस ठाण्यात विक्रमी रक्तदान शिबिर घेतले, याबद्दल ठाकरे यांनी कौतुक केले. इतर कोणताही पक्ष असे शिबिर घेऊ शकत नाही, त्यांना तर बॅनर लावायलाही माणसे मिळणार नाहीत, अशी टीका त्यांनी केली.