"उद्धव बेटा, मला तुला भेटायचंय", मुख्यमंत्र्यांच्या शिक्षिकेचं आर्जव; तौत्के वादळानं वृद्धाश्रम मोडकळीस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 01:39 PM2021-05-26T13:39:51+5:302021-05-26T13:55:49+5:30
Teacher sends SOS to CM Uddhav Thackerays after cyclone Tauktae : तौत्के चक्रीवादळचा पश्चिम किनारपट्टीला जोरदार तडाखा बसला. यात समुद्र किनाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. वसई येथील एका वृद्धाश्रमालाही वादळाचा फटका बसला.
तौत्के चक्रीवादळचा पश्चिम किनारपट्टीला जोरदार तडाखा बसला. यात समुद्र किनाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. वसई येथील एका वृद्धाश्रमालाही वादळाचा फटका बसला. न्यू लाइफ फाऊंडेशनच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीचा दरवाजा कोसळून एक वृद्ध नागरिक जखमी देखील झाला. विशेष बाब अशी की या वृद्धाश्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना शालेय शिक्षण दिलेले शिक्षकही राहत आहेत. (Teacher sends SOS to CM Uddhav Thackerays after cyclone Tauktae)
सुमन लक्ष्मीकांत रणदिवे (८८) या दादरच्या बालमोहन विद्या मंदिरात गणित आणि विज्ञान विषयाच्या शिक्षिका होत्या. १९९१ साली त्या निवृत्त झाल्या. गेल्या वर्षभरापासून त्या वसईतील न्यू लाइफ फाऊंडेशनच्या वृद्धाश्रमात राहत आहेत. 'मिड डे' या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, न्यू लाइफ फाऊंडेशनच्या वृद्धाश्रमाची वास्तू मोडकळीस आली आहे आणि इथल्या अपुऱ्या सुविधांमुळे वृद्धांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.
"चक्रीवादळामुळे आमच्या वृद्धाश्रमाचं खूप नुकसान झालं. छप्पर उडालंय. सगळ्या वृद्धांना रात्री झोपायला त्रास होतो. मच्छर चावतात. उद्धव बेटा मला तुला भेटायचं आहे. तू शिवाजी पार्कमध्ये शाळेत असातना मी तुला शिकवलं होतं. इथली परिस्थिती खूप खराब आहे. कृपया आम्हाला मदत कर", असं आर्जव शिक्षिका सुमन यांनी केलं आहे.
तौत्के चक्रीवादळाने वसई-विरार समुद्र किनाऱ्याला मोठा फटका बसला होता. याच परिसरात न्यू लाईफ फाऊंडेशन हे वृद्धाश्रम आहे. या वृद्धाश्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिक्षिका सुमन जवळपास २५ वृद्धांसह राहतात. तौत्के चक्रीवादळाने या वृद्धाश्रमाचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे या शिक्षिकेने आता आपल्या विद्यार्थ्यांकडे मदतीची मागणी केली आहे.