Sanjay Raut: उद्धव ठाकरेंचा घसा भरुन आला, संजय राऊतांनी सांगितली 'फोन की बात"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 08:43 PM2022-11-09T20:43:06+5:302022-11-09T20:43:35+5:30
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत भव्य रॅलीत सामील होऊन घराकडे निघाले आहेत
मुंबई - कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 100 दिवसानंतर राऊत तुरुंगातून बाहेर आले. राऊतांना जामीन मिळाल्याने ठाकरे गटाच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत उत्साहाचे वातावरण आहे. तुरुंगाबाहेर आल्यानंतर राऊत आपल्या जुन्या स्टाईलमध्ये परतले आहेत. बाहेर येताच राऊत यांनी आक्रमक प्रतिक्रिया देताना एकच शिवसेना खरी, बाकी धोत्र्याच्या बीया कडू.. असे म्हणत शिंदे गटावर निशाणा साधला. यावेळी, उद्धव ठाकरेंसोबत फोनवर झालेला संवादही त्यांनी सांगितला.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत भव्य रॅलीत सामील होऊन घराकडे निघाले आहेत. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, 'मी गेल्या शंभर दिवसांपासून तुरुंगात होतो. बाहेर काय सुरू होतं, ते आत राहून कळतं नव्हतं. बाहेर येऊन समजतंय की, आता उद्धव ठाकरेंचीशिवसेना झाली आहे. पण, आमचा कणा मोडलेला नाही. आम्ही शिवसैनिक आहोतत, लढत राहू.'
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर बातचित झाली का? असा प्रश्न विचारण्यात पत्रकाराने विचारला होता. यावर त्यांनी हो असं उत्तर दिलं. तसेच, “उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर बातचित झाली. तेही माझा आवाज ऐकण्याची वाट पाहत होते. त्यांचाही घसा भरुन आला होता”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना दिली. दरम्यान, आता शिवतिर्थवर जाऊन बाळासाहेबांच्या समाधीस्थळाचं दर्शन घ्यायचंय, असेही राऊत यांनी सांगितले.
एकच शिवसेना खरी
ते पुढे म्हणतात की, 'आमचं आयुष्य बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसोबत गेलं. एकच शिवसेना खरी आहे, ती म्हणजे बाळासाहेबांनी निर्माण केलेली आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील. बाकी सगळ्या धोत्र्याच्या कडू बिया आहेत. हा महाराष्ट्र-मुंबई कोणाच्या मागे आहे, ते त्यांना हळुहळू कळेलच.'
आता तर मशाल आहे...
'त्यांचं हे तात्पुरतं राजकारण सुरू आहे. आता बाहेर आलोय, हळुहळू कामाला लागू. गेल्या 30-35 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर बाळासाहेबांचा भगवा फडकत आहेत, तो तसाच फडकत राहणार. त्या भगव्याला कोणी हात लावाल, तर जळून खाक व्हाल. असे तेज त्या भगव्यात बाळासाहेबांनी निर्माण केलं आहे. आता तर मशाल आहे...' अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.