उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा रद्द; पूरग्रस्त भागाची करणार होते पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 08:46 AM2019-09-06T08:46:54+5:302019-09-06T08:47:30+5:30
मुंबईत पाऊस पडून पाणी साचल्याने उद्धव ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
मुंबई - सांगली, कोल्हापूर येथे आलेल्या महापुरामुळे अनेक गावं उद्ध्वस्त झाली. काही लोकांचे जीव गेले. सत्ताधारी पक्षाचे नेते मुख्यमंत्र्यासह मंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला होता मात्र उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागात जाणं टाळलं होतं. आज उद्धव ठाकरे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोल्हापूरला जाणार होते. मात्र रात्री अचानक त्यांचा हा दौरा रद्द झाल्याची माहिती मिळाली आहे.
शुक्रवारी सकाळी 11 वाजता अंबाबाईचे दर्शन घेऊन कोल्हापुरातील चिखली, आंबेवाडी आणि आसपासच्या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापूरला जाणार होते. मात्र आता उद्धव ठाकरेंचा दौरा रद्द झाल्याने त्यांच्याऐवजी शिवसेना नेते दिवाकर रावते पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत. मुंबईत पाऊस पडून पाणी साचल्याने उद्धव ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
कोल्हापूर सांगली भागात आजही पावसाचा जोर कायम आहे. राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. तर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 32 फूट वाढ झाली आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. तर पाण्याची पातळीत वाढ होत असल्याने गावकऱ्यांनी सतर्क राहावं, सुरक्षितस्थळी स्थलांतर व्हावे अशी सूचना कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे.
दरम्यान, पावसाचा जोर वाढल्याने राधानगरी धरणाचा सातव्या क्रमांकाचा दरवाजा गुरुवारी दुपारी खुला झाला. खुले झालेल्या दरवाजांची संख्या पाच झाली आहे. सातपैकी पाच दरवाजातून आठ हजार ५४० क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. हीच परिस्थिती अन्य धरणांचीही आहे.
जिल्ह्यातील सर्वच धरणे काठोकाठ भरली असल्याने त्यातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. वारणेतून ११ हजार ७०३, काळम्मावाडी धरणातून १५ हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. कासारीतून १२००, पाटगावमधून १८७४, कुंभीतून १४००, तुळशीतून ११०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. कोयनेतून ८७ हजार, अलमट्टीतून एक लाख नऊ हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे.