बुलढाणा - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौरा सुरू असतानाच शिवसेना (उबाठा) पक्षातील महिला नेत्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विदर्भातीलमहिला नेत्या आणि उबाठा पक्षाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी मुंबईतील महिला नेत्यांवर ठपका ठेवत शिवसेना पक्षाला जय महाराष्ट्र केलं आहे. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले आहे. त्यानंतर, शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांचीही विभागणी झाल्याचं दिसून आलं. अनेक नेते शिंदेंसोबत गेले, त्यात महिला नेत्यांचाही समावेश आहे.
शिवसेना उबाठा पक्षाला जय महाराष्ट्र करत महिला आमदार मनिषा कायंदे यांनीही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेतील ही राजी-नाराजी अद्यापही सुरुच असल्याचे दिसते. उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यावेळीच विदर्भातील महिला नेत्याने सोशल मीडियातून आपला राजीनामा दिला आहे.
दरम्यान, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असून ते बुलढाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रमासाठी गेले आहेत. मात्र, मनोहर जोशींच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांनी आजचे सर्वच कार्यक्रम रद्द केले असून ते मुंबईकडे निघाले आहेत. ''आज आम्ही जरी दौऱ्यावर असलो तरी दौरा थांबवून मुंबईकडे निघतोय, राज्यभरातून, देशभरातून डॉ. मनोहर जोशींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.'', असे माहिती संजय राऊत यांनी दिली. दरम्यान, जळगावच्या जामोद येथे गुरुवारी उद्धव ठाकरेंची जाहीर सभाही झाली.