मुंबई - भाजप नेत्यांकडून सातत्याने होणारी टिका, राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या भोंग्याचा वाद आणि हिंदुत्त्वाचा मुद्दा. दुसरीकडे राणा दाम्पत्य आणि विरोधकांकडून सातत्याने शिवसेनेवर होणारी टिका, यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केल्याप्रमाणे आज मुंबईतील बीकेसी मैदानात त्यांची जोरदार सभा झाली. या सभेत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी विकासकामांवर भाषण करत राज्य सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली. त्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर तोफ डागली. महागाईवरुन केंद्रातील मोदी सरकार हल्लाबोल केला. तसेच, पेट्रोल दरवाढीवरुन मोदींनी दिलेल्या सल्ल्याचाही समाचार घेतला.
उद्धव ठाकरेंनी हिंदुत्त्वाच्या मुदद्यावरुन भाजपला लक्ष्य केलं. देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टिका केली. हिंदुत्त्व म्हणजे काय धोतर वाटलं का तुम्हाला, हिंदुत्व ही नेसण्याची किंवा सोडण्याची गोष्ट नाही. आम्ही काँग्रेससोबत गेलो उघड गेलो, तुमच्यासारखा सकाळचा शपथविधी नाही केला आम्ही, तुम्ही केलं तर पवित्र आणि आम्ही केलं तर अपवित्र, असे म्हणत भाजपला इतिहास सांगितला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोविडसंदर्भात घेतलेल्या सभेत पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याचा सल्ला दिला होता. त्यावरुनही, मोदींनी, केंद्र सरकारला टोला लगावला.
देशात महागाई प्रचंड वाढली आहे, तुम्ही आम्हाला पेट्रोलचं सांगता आणि आमचे जीएसटीचे पैसे देत नाहीत. दुसरीकडे गॅस किती महागलाय, 1 हजार रुपयांच्यावर नेऊन सोडलाय. तुम्ही मोफत धान्य दिल्याचं सांगता, पण ते खायचं कसं, कच्च खाणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. तसेच, मी मोदींच्या ती मिटींग आयपीएल मॅचसारखी पाहत होतो, कारण मला काहीच बोलायचं नव्हतं, असे म्हणत मोदींच्या कोविडसंदर्भातील सभेचा समाचार घेतला. तसेच, ''1973 साली अटलबिहारी वाजपेयी बैलगाडीवरुन संसदेत गेले होते. तेव्हा, केवळ सात पैसे दर वाढले होते. मग ही संवेदनशील भाजप गेली कुठे? असा परखड सवालही उद्धव ठाकरेंनी महागाईच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकार आणि भाजपला विचारला.
भाजपला गाढव असं संबोधलं
उद्धव ठाकरेंनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष्य केलं. देवेंद्र फडणवीसांनी गदाधारी हिंदुत्वावरुन आम्हावर टिका केली. आमचं हिंदुत्व हे गधादारी होतं, तो गधा आम्ही आता सोडून दिलाय. आमच्यासोबत असलेले हे गाढवं होते, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला गाढवं असे संबोधले. 1 मे च्या सभेत देवेंद्र फडणवीस मुंबई स्वतंत्र करणार असं म्हणाले. मात्र, ही मुंबई आम्हाला आंदण म्हणून मिळाली नाही. त्यामुळे, या मुंबईला तोडण्याचे प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
नामांतराची गरजच काय, ते संभाजीनगरच
औरंगाबादमध्ये औवेसींच्या झालेल्या सभेचा उल्लेख करताना भाजपच्या ए.बी.सी. टीमा पुढे केल्या जातात. कुणाला थडग्यावर डोकं टेकायला लावतात, कुणाला घंटा बडवायला दिला जातो, तर कुणाला भोंगा दिला जातो. आमच्या संभाजीनगरमध्ये असे म्हणत संभाजीनगरचा उल्लेख करताना, नामांतर करण्याची गरजच काय, ते आहेच संभाजीनगर, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं नाही. आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर टिका आणि तुम्ही गेले तेव्हा काय? असे म्हणत पहाटेच्या शपथविधीवर उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला.