पाकिस्तानी दहशतवादी हिंदुस्थानची नाडी कश्मीरात रोज सोडत आहेत त्यामुळे तिरंग्याची मान खाली जाते - उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 07:25 AM2018-02-08T07:25:36+5:302018-02-08T07:28:37+5:30
देश गंभीर संकटात असताना ‘पकोडे-भजी’ यावर चर्चेत गुंतवून ठेवायचे व कश्मीरात आमच्या जवानांनी रोजच शहीद व्हायचे. मोदी सरकारला सत्तेवर येऊन चार वर्षे झाली आहेत
मुंबई - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यसभेत केलेल्या पकोडयाच्या वक्तव्याला काश्मीरमधल्या सद्य परिस्थितीशी जोडून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून नरेंद्र मोदी सरकारवर अत्यंत बोच-या शब्दात टीका केली आहे. पाकिस्तान व त्यांचे दहशतवादी हिंदुस्थानची नाडी कश्मीरात रोज सोडत आहेत व त्यामुळे तिरंग्यास मान खाली घालावी लागत आहे.
देश गंभीर संकटात असताना ‘पकोडे-भजी’ यावर चर्चेत गुंतवून ठेवायचे व कश्मीरात आमच्या जवानांनी रोजच शहीद व्हायचे. मोदी सरकारला सत्तेवर येऊन चार वर्षे झाली आहेत. कश्मीर प्रश्नाचा पकोडा उकळत्या तेलातच फुटला आहे. जवान मरत आहेत व कश्मिरी पंडित अजूनही निर्वासित आहेत असे अग्रलेखात म्हटले आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात
- जम्मू-कश्मीरमधील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे व दिल्लीच्या धमक्या पोकळ ठरवल्या जात आहेत. गेल्या आठ दिवसांत सीमेवर ज्या घटना घडत आहेत त्या फक्त चिंताजनक नाहीत तर बलाढ्य व शक्तिमान म्हणून मिरवणाऱ्या देशाला मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत. लश्कर-ए-तोयबाचे दहशतवादी ‘धाड धाड’ गोळ्या झाडत श्रीनगरातील महाराजा हरिसिंह रुग्णालयात घुसतात व सुरक्षा दलाच्या ताब्यातील खतरनाक दहशतवाद्यास घेऊन पसार होतात. या भयंकर हल्ल्यात सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले आहेत. मोहम्मद नावेद ऊर्फ अबू हंजाला या अतिरेक्यास सहीसलामत पळवून नेले. तो पाकिस्तानातून कश्मीरात घुसलेला अतिरेकी होता व अनेक दहशतवादी हल्ल्यांत त्याचा हात होता. लष्करी छावण्यांवर हल्ला केल्याचा त्याच्यावर आरोप होता. कश्मीरातील सरकार हे कोसळून पडले असून त्या सरकारी मुडद्यांवर दहशतवाद्यांचा नंगानाच सुरू आहे. राजौरी जिल्ह्यातील भिंबरमध्ये रविवारी पाक रेंजर्सनी ‘मिसाईल’ हल्ला केला व त्यात कॅप्टन कपिल कुंडूसह चार जवान शहीद झाले. पाठोपाठ काकापोरा भागातील लष्करी तळांवर हल्ला झाला.
- आता श्रीनगरातील इस्पितळावर हल्ला करून दहशतवाद्यास पळवून नेले. गेल्या महिनाभरात पाकड्यांनी शंभरदा घुसखोरी व गोळीबार केला आणि त्यात आमचे पंधरा जवान शहीद झाले तरी आमच्या देशात ‘पकोडे’ व ‘भजी’ तळण्यावर राजकीय चर्चा सुरू आहे. पाकिस्तानला चोख उत्तर देऊ असे रोज बोलले जात आहे, पण राज्यकर्त्यांना उत्तर सापडत नाही काय? कश्मीर प्रश्नांचा सत्यानाश पंडित नेहरूंनी केला व काँग्रेस पक्षाला हा प्रश्न सोडवता आला नाही म्हणून भारतीय जनता पक्षाच्या हातात जनतेने राज्य दिले आहे. काँग्रेस पक्षाने या प्रश्नी नालायकी दाखवली व दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकले हा आरोप जे करीत होते त्यांनी गेल्या चार वर्षांत पाकड्यांचे गुडघे फोडले काय किंवा दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले काय? चरार-ए-शरीफ दर्ग्यात चार अतिरेकी घुसले व त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींच्या बहिणीनेच अपहरणाचा बनाव रचला होता. चरार-ए-शरीफ दर्ग्यात अतिरेक्यांना बिर्याणीची ताटे पोहोचविण्याची नामुष्की आमच्या जवानांवर तेव्हा आली व राज्यकर्ते काँगेसचे असल्याने भाजपच्या तोफा त्यांच्यावर डागल्या गेल्या. तत्कालिन पंतप्रधान व्ही. पी. सिंगांनी मेहबुबा भगिनींच्या सुटकेसाठी अतिरेकी सोडले व आता मेहबुबांच्या राज्यात सरकारचा मुडदा पाडून अतिरेक्यास पळवून नेले गेले.
- म्हणजे परिस्थितीत फरक पडलेला नाही. उलट अधिकच बिघडत चालली आहे. पाकिस्तानला धडा शिकविण्याची हिंमत काँगेस पक्षात नव्हती, पण इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचा पराभव करून फाळणी केली होती. हिमतीचेच काम बाईंनी तेव्हा केले होते व त्या वेळी अमेरिका हिंदुस्थानच्या विरोधात पाकिस्तानच्या बाजूने होती. आज अमेरिका मोदी यांच्या खिशात आहे व फ्रान्स, जर्मनी, इस्रायलसारखी राष्ट्रे मोदींच्या तालावर डोलत असल्याचे कानावर येते. पाकिस्तानला जगात एकाकी पाडल्याचे बोलले जाते. अमेरिकेने पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळल्याचा आनंद दिल्लीने साजरा केला, पण पाकिस्तान व त्यांचे दहशतवादी हिंदुस्थानची नाडी कश्मीरात रोज सोडत आहेत व त्यामुळे तिरंग्यास मान खाली घालावी लागत आहे. देशातील गंभीर प्रश्नांवरून लक्ष उडावे यासाठी वैचारिक पकोड्यांचे तळणे सुरू आहे. देश गंभीर संकटात असताना ‘पकोडे-भजी’ यावर चर्चेत गुंतवून ठेवायचे व कश्मीरात आमच्या जवानांनी रोजच शहीद व्हायचे. मोदी सरकारला सत्तेवर येऊन चार वर्षे झाली आहेत. कश्मीर प्रश्नाचा पकोडा उकळत्या तेलातच फुटला आहे. जवान मरत आहेत व कश्मिरी पंडित अजूनही निर्वासित आहेत.