मुंबई
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवसेना सोडतानाच्या घटनांना पुन्हा एकदा उजाळा देत संपूर्ण घटना सविस्तर सर्वांसमोर ठेवली आहे. उद्धव ठाकरे यांना आपण त्यावेळी स्वत:हून तुला काय हवंय? हे विचारलं होतं आणि त्यावेळी उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्रीही व्हायचंय का? यावर हो म्हटलं होतं, असं राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं.
"शिवसेनेतील नेतृत्त्वावरुन जेव्हा सगळ्या घटना सुरू होत्या. तेव्हा फक्त सर्वांना महाबळेश्वरचं ते अधिवेशन दिसतं. पण त्यामागे भरपूर घटना घडल्या आहेत. माझं नाव आणि फोटो बॅनरवर काढून टाकले जात होते पण त्याच्याशी माझं काही घेणंदेणं नव्हतं. मी त्यावेळी घरातून निघालो आणि उध्दवला घेऊन ऑबेरॉय होटेलला गेलो. तेव्हा त्याला समोर बसवून स्पष्ट विचारलं होतं. तुला काय हवंय? तुला प्रमुखपद हवंय का? त्यावर तो हो म्हटला होता. भविष्यात शिवसेनेची सत्ता आली तर मुख्यमंत्री व्हायचंय का? त्यावरही उद्धव तेव्हा हो म्हटले होते. हे मी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन तुम्हाला सांगत आहे", असं राज ठाकरे म्हणाले.
नारायण राणेही बाहेर गेले नसतेनारायण राणे देखील उद्धव ठाकरेंमुळेच शिवसेनेतून बाहेर पडल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. "ज्यावेळी नारायण राणे पक्षाबाहेर जात होते तेव्हा आपण फोन करुन असं करू नका. मी बाळासाहेबांशी बोलतो असं म्हटलं होतं. तेव्हा राणेंनीही ठिक आहे तुम्ही बोला असं मला म्हटलं तसं मी लगेच बाळासाहेबांना फोन करुन सांगितलं. राणेंची इच्छा नाहीय शिवसेना सोडायची त्यांना जाऊ देऊ नका. तेव्हा बाळासाहेब मला म्हणाले त्याला घेऊन ये. मी लगेच फोन ठेवला आणि राणेंना फोन करुन आपल्याला साहेबांना भेटायला जायचं आहे असं सांगितलं. पण पाच मिनिटांनी मला पुन्हा बाळासाहेबांचा फोन आला आणि तेव्हा मला राणेंना नको यायला सांगू असं सांगण्यात आलं. त्यावेळी फोनवर बाळासाहेबांच्या मागे कोणतरी बोलतंय असं ऐकू आलं होतं", असं राज ठाकरे म्हणाले.