"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 08:01 PM2024-05-17T20:01:04+5:302024-05-17T20:02:18+5:30
Lok Sabha Election 2024 : या सभेत रामदास आठवले यांनी आपल्या भाषणाची सुरुवात कविवेतून करत उद्धव ठाकरेंवर जोरदार फटकेबाजी केली.
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात अखेरच्या टप्प्यासाठी, तर देशात पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघात मतदान होणार आहे. या टप्प्यातील प्रचाराची सांगता शनिवारी होणार आहे. त्यामुळे आज मुंबईत दादर येथील शिवाजी पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुतीची सभा होत आहे. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित आहेत. दरम्यान, या सभेत रामदास आठवले यांनी आपल्या भाषणाची सुरुवात कविवेतून करत उद्धव ठाकरेंवर जोरदार फटकेबाजी केली.
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे... कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे... काँग्रेस-राष्ट्रवादीचा आयुष्यभर विरोध करत आले बाळासाहेब ठाकरे...मग, तुम्ही त्यांच्याकडे का गेलात उद्धव ठाकरे....उद्धवजी तुम्हाला जे बोलायचं असेल ते बोला पण, 4 तारखेला आम्हीच देणार आहोत जबरदस्त टोला.... असे म्हणत रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे म्हणतात की, मला पंतप्रधान बनायचे आहे. तिकडे जाऊन कसे बनणार तुम्ही? कोण बनवणार तुम्हाला पंतप्रधान? बाळासाहेब ठाकरे हे काँग्रेस, राष्ट्रवादीचा आयुष्यभर विरोध करत आले, मग तुम्ही त्यांच्याकडे का गेलात? असे सवाल करत रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच, या महाराष्ट्रात देशात निवडणुकीचा उत्सव आज साजरा करत आहोत. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मजबूत आहेत. राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज ठाकरे आणि आम्ही सर्वजण मजबूत आहोत, असे रामदास आठवले म्हणाले.
आपल्याला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. मुंबईचा विकास करायचा आहे. आपले सहा उमेदवार मुंबईचे निवडून आणायचे आहेत. या मुंबईला नरेंद्र मोदी यांनी भरपूर निधी दिलेला आहे. अजूनही मुंबईच्या विकासासाठी हजारो कोटी रुपये मिळणार आहेत. मुंबईला तोडण्याचा कुणाचाही डाव नाही. मुंबई ही महाराष्ट्राची आहे. मुंबईला कुणी तोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना झोडून टाकल्याशिवाय राहणार नाही. निवडणुका आल्या की मुंबई तोडणार आहे. बाळासाहेब आंबेडकरांचे संविधान धोक्यात आहे, असे म्हटले जात आहे. मात्र, संविधान धोक्यात नाही तर तुम्ही महाविकास आघाडीसोबत तुम्ही धोक्यात आहात, अशी टीका सुद्धा रामदास आठवले यांनी केली.
दरम्यान, नरेंद्र मोदींच्या सभेच्या निमित्ताने संपूर्ण शिवाजी पार्क कापडाच्या माध्यमातून झाकण्यात आलेलोआहे. नरेंद्र मोदींच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शिवादी पार्कच्या चारही बाजूला पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दल, शीघ्र कृती दल तसंच दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलेले आहे. तसेच, या मैदानाच्या चारही बाजूंना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे कटआउट्सदेखील लावण्यात आले आहेत.