Join us  

शेतकरी आत्महत्यांवरून उद्धव यांचा भाजपावर निशाणा

By admin | Published: January 16, 2016 8:55 AM

सामुदायिक लग्नसोहळ्यांप्रमाणे शेतकर्‍यांच्या सामुदायिक मौतीचे सोहळे सुरू झाल्यास त्यांच्या भडकणार्‍या चितांना ‘मेक इन महाराष्ट्र’ म्हणावे का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी भाजपा सरकारला विचारला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची विवंचना संपणार तरी कधी, याचे उत्तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी द्यायलाच हवे. सामुदायिक लग्नसोहळ्यांप्रमाणे राज्यात शेतकर्‍यांच्या सामुदायिक मौतीचे सोहळे सुरू झाले तर त्यांच्या भडकणार्‍या चितांना ‘मेक इन महाराष्ट्र’ म्हणावे काय? असा सवाल विचारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपा सरकारवर निशाणा साधला. शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या मुद्यावरून त्यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 
आज संपूर्ण सत्ता-प्रशासन-राज्याची तिजोरी विदर्भाच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे, पण विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या काही थांबत नाहीत. जालन्यातील शेषराव शेजूळ या शेतकर्‍याने आपल्या अंत्यविधीचे निमंत्रण देऊन जाहीर आत्महत्या केली. शेतकर्‍यांचे मायबाप असलेले सरकारसुद्धा त्यांचे नातलगच झाले, पण शेषरावसारख्या असंख्य शेतकर्‍यांच्या मौतींनी सरकारचे काळीज जरा तरी पाझरले काय? असा सवालही अग्रलेखात विचारण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या विदर्भात गेल्या वर्षभरात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा आकडा वाढला आहे. श्रीहरी अणेंसारखे लोक स्वतंत्र विदर्भाचा जुगारी मटका लावीत असले तरी विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्य घायाळ झाले आहे, अशी टीका लेखात करण्यात आली आहे. ‘‘विदर्भातील एकाही शेतकर्‍यास आत्महत्या करू देणार नाही!’’ अशा घोषणा करणारे सर्व विदर्भाचे सुपुत्र आज महाराष्ट्र सरकारचे सर्वेसर्वा असतानाही शेतक-यांच्या आत्महत्या थांबताना दिसत नाहीत, असे उद्धव यांनी म्हटले आहे.
 
काय म्हटले आहे अग्रलेखात :
- महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची विवंचना संपणार तरी कधी, याचे उत्तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी द्यायलाच हवे. मुख्यमंत्र्यांचे बोलके पोपट श्रीहरी अणे सकाळ-संध्याकाळ वेगळ्या विदर्भाची पोपटपंची करीत आहेत. आज संपूर्ण सत्ता-प्रशासन-राज्याची तिजोरी विदर्भाच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे, पण विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या काही थांबत नाहीत. शेतकर्‍यांनी जणू सामुदायिक आत्महत्या व अंत्ययात्रेचा निर्णय घेतलेला दिसतोय. विदर्भापाठोपाठ मराठवाड्यातील जालना येथून आलेली बातमी कानात कडक शिसे ओतल्याप्रमाणेच आहे. जालना जिल्ह्यात खरपुडी गावातील शेषराव शेजूळ या शेतकर्‍याने तर आपल्या अंत्यविधीचे निमंत्रण देऊन जाहीर आत्महत्या केली. ‘‘मी उद्या आत्महत्या करणार आहे, माझ्या मौतीला या!’’ असे निमंत्रण नातलगांना व शेजार्‍यांना दिले आणि नंतर लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. सरकार म्हणजे शेतकर्‍यांचे मायबाप. म्हणजे सरकारसुद्धा शेतकर्‍यांचे नातलगच झाले. या सर्व नातलगांना आमंत्रण देऊन शेषरावांनी त्यांच्या मौतीचा ‘उत्सव’ साजरा केला, पण शेषरावसारख्या असंख्य शेतकर्‍यांच्या मौतींनी सरकारचे काळीज जरा तरी पाझरले काय?
-  त्यांनी स्वत:च्या मौतीचा ‘उत्सव’ साजरा केला. गळफास घेतला व सरकारच्या गळ्याभोवतीच फास आवळला. सरकार राजकीय उत्सवबाजीचे भिजले फटाके सुकवीत बसले आहे व शेषरावांसारखे शेतकरी आपली तिरडी स्वत:च बांधून राज्यकर्त्यांच्या खुर्चीखाली वेदनेचे जाळ लावीत आहेत. पुढील महिन्यात महाराष्ट्राचे सरकार ‘मेक इन इंडिया’चा भव्य उत्सव मुंबईत साजरा करणार आहे. हा राजकीय सोहळा असेलही, पण शेषरावांसारख्या हजारो शेतकर्‍यांचे मरण हेसुद्धा ‘मेक इन इंडिया’ व ‘मेक इन महाराष्ट्रा’चेच उत्पादन मानायचे काय? आत्महत्यांचे हे ‘उत्पादन’ आधी थांबवा! बाकी ‘मेक इन इंडिया’ मग सुरूच राहील.
- मुख्यमंत्र्यांच्या विदर्भात गेल्या वर्षभरात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा आकडा वाढला आहे. श्रीहरी अणेंसारखे लोक स्वतंत्र विदर्भाचा जुगारी मटका लावीत असले तरी विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्य घायाळ झाले आहे. २०१५ मध्ये विदर्भातील ६ जिल्ह्यांत एकूण १४०० शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. ‘‘विदर्भातील एकाही शेतकर्‍यास आत्महत्या करू देणार नाही!’’ अशा घोषणा करणारे सर्व विदर्भाचे सुपुत्र आज महाराष्ट्र सरकारचे सर्वेसर्वा आहेत, पण शेतकर्‍यांच्या ‘मौती’मुळे स्मशानात लाकडे कमी पडू लागली आहेत. 
- अस्मानी, सुल्तानी, नापिकी, कर्जबाजारीपणा, वैफल्य, चिंता-ताप अशी जी काही कारणे असायची ती आहेतच, पण शेतकर्‍यांच्या दु:खाचे निवारण कोणी केले नाही! उलट शेतकर्‍यांची क्रूर चेष्टाच राज्यात सुरू आहे. तिकडे जळगावात तर पीक विम्याची रक्कम मागण्यासाठी जिल्हा बँकेत गेलेल्या शेतकर्‍यांविरुद्ध पोलिसांनी थेट दरोडेखोरीचे गुन्हे दाखल केले. म्हणजे हक्काचे देणे देण्याऐवजी शेतकर्‍यांच्या कपाळी दरोडेखोर असा शिक्का मारण्याचे हे पाप मोगलाईच्या कारभाराचे नाही तर कसले म्हणायचे? शेतकर्‍यांना मदत देण्याच्या फक्त घोषणा होतात. प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या ओंजळीत एक आणाही पडत नाही.