विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाचव्या स्मृतिदिनी आयोजित कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषण टाळून मौन धारण करणे पसंत केले. मात्र, त्यांनी व्यासपीठावर व महापौर बंगल्यावर मुख्यमंत्र्यांशी गुजगोष्टी केल्या.बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळी उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक संकेतस्थळाचे लोकार्पण दोघांच्या हस्ते महापौर बंगल्यात करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्र्यांचे भाषण झाले, पण उद्धव यांनी भाषण केले नाही, शिवाय त्यांनी प्रसिद्धी माध्यमांनाही टाळले. भाजपा-शिवसेनेच्या ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर ते आज काय बोलतात, याविषयी उत्सुकता होती, पण त्यांनी न बोलण्याचेच ठरविले.बाळासाहेब ठाकरे हे सर्वांसाठी स्फूर्ती देणारे, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वाटचालीमध्ये त्यांनी स्वत:चा ठसा उमटवला. सर्वांना प्रेरणा मिळेल, असे त्यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी सर्व परवानग्या दिल्या असून, पर्यावरणीय मान्यता अंतिम टप्प्यात आहे. स्मारकाच्या निर्मितीमध्ये सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस या वेळी म्हणाले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी संकेतस्थळाची संकल्पना स्पष्ट केली.दोघांमध्ये बंदद्वार चर्चा-या वेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात काही मिनिटे बंद खोलीत चर्चा झाली. नारायण राणेंच्या राजीनाम्याने रिकाम्या झालेल्या एका जागेसाठी होणा-या विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे समजते.२ कोटींची मदत : शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी जमविलेल्या २ कोटी रुपयांचा धनादेश उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द केला. ही रक्कम शेतकरी सहाय्यता निधीसाठी देण्यात आली असून, त्यात १० लाख रुपयांचा वाटा स्वत: ठाकरे यांनी उचलला आहे.स्मृतिस्थळाचे दर्शन-शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळाचे आज हजारो शिवसैनिकांनी दर्शन घेतले. दर्शन घेताना काही शिवसैनिकांना अश्रू आवरत नव्हते.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव यांचे मौन, भाषण करण्याचे टाळले; मुख्यमंत्र्यांशी मात्र गुजगोष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 3:09 AM