Join us

Udhav Thackery: मेव्हणे, मेव्हणे, मेव्हण्यांचे पाहुणे, ईडीच्या धाडीनंतर मनसेनं उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 12:34 PM

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी या धाडीच्या कारवाईनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.

मुंबई - महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमागे सुरू असलेला केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीचा ससेमिरा आता थेट मातोश्रीपर्यंत पोहोचला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी पुष्पक ग्रुपच्या ६ कोटी ४५ रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील ११ सदनिका सील करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर विरोधी पक्षांकडून शिवसेनाला लक्ष्य करण्यात येत आहे.

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी या धाडीच्या कारवाईनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. आप्‍तांच्‍या तिजोऱ्यांमध्ये मात्र कोट्यवधींची भर. ही संपत्‍ती कुठून आली? कोणाकडून आणली? शिवसैनिकांच्‍या वाट्याला यातील काहीही नाही. सत्ता फक्‍त आपण आणि आपल्‍या नातेवाईकांसाठीच! आगे आगे देखिए होता है क्‍या! असा इशाराच नारायण राणेंनी दिला आहे. तर, दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दुनियादारी चित्रपटातील एक व्हिडिओ सीन शेअर केला आहे. त्यामध्ये, अभिनेता जितेंद्र जोशी, मेव्हणे, मेव्हणे, मेव्हण्यांचे पाव्हणे... असे म्हणताना दिसून येतो. सध्या 6 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरुनही व्हायरल होत आहे.  या व्हिडिओसोबतच पाहुणे आले घरापर्यंत.. असे कॅप्शनही संदीप देशपाडे यांनी दिले आहे. मात्र, कुठेही कोणाच्या नावाचा उल्लेख त्यांनी केला नाही. पण, त्यांचा टीकेचा, खिल्ली उडविण्याचा रोख शिवसेनेकडेच असल्याचे दिसून येत आहे. 

उद्धव ठाकरेंना झोप लागणार नाही – किरीट सोमय्या

पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्यांनी यावर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली आहे. उद्धव ठाकरेंचे सरकार माफिया सरकार आहे. श्रीधर पाटणकर यांच्या बँक खात्यातून पुढे कुणाला पैसे ट्रान्सफर झाले. त्याची माहिती जनतेसमोर आल्यास उद्धव ठाकरेंची झोप उडेल. पुढील काळात सर्व भ्रष्टाचाराचा हिशोब होणार असं त्यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, पुष्पक ग्रुपची कंपनी असलेल्या पुष्पक बुलियनविरोधात मार्च २०१७ मध्ये काळ्या पैशांबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर, पुष्पक बुलियन्सच्या २१.४६ कोटींच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली होती. ही मालमत्ता महेश पटेल, चंद्रकांत पटेल व त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित होती. महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदी याच्या संगनमताने पुष्पक समूहातील पुष्पक रियल्टीचा निधी हस्तांतरित केला. पुष्पक रियल्टी डेव्हलपरने विक्रीच्या नावे हा निधी हस्तांतरित केला होता. यातूनच पुढे, चतुर्वेदीच्या नियंत्रणाखाली असलेल्या संस्थांना २०.०२ कोटींचे हस्तांतरण केले गेले. नंदकिशोर चतुर्वेदी नावाचा डेटा एन्ट्री ऑपरेटर असून, त्याने हमसफर डीलर प्रा. लि. कंपनी या बनावट कंपनीच्या माध्यमातून ३० कोटींचे विनातारण कर्ज श्रीधर पाटणकर यांच्या मालकीच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीत वळते केले. चतुर्वेदीशी संगनमत करून हा पैसा महेश पटेलने लाटला व तो श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि.च्या बांधकाम प्रकल्पात गुंतवला. 

नंदकिशोर चतुर्वेदी नावाचा डेटा एन्ट्री ऑपरेटर असून, त्याने हमसफर डीलर प्रा. लि. कंपनी या बनावट कंपनीच्या माध्यमातून ३० कोटींचे विनातारण कर्ज श्रीधर पाटणकर यांच्या मालकीच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीत वळते केले. चतुर्वेदीशी संगनमत करून हा पैसा महेश पटेलने लाटला व तो श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि.च्या बांधकाम प्रकल्पात गुंतवला. 

सूड भावनेने सत्ताधाऱ्यांना त्रास 

सर्व केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा देशापुढील सध्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे. राजकीय सुडाच्या हेतूने सत्ताधाऱ्यांना त्रास देण्यासाठी हा कार्यक्रम हातामध्ये घेण्यात आला आहे. स्पष्ट सांगायचं म्हणजे, पाच दहा वर्षांपर्यंत ईडीचं नाव कोणाला माहिती नव्हतं, पण आता तर गावागावांमध्ये ईडी पोहोचली आहे. या सर्व यंत्रणांचा सध्या दुर्दैवाने गैरवापर सुरू आहे, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले.

सदनिकांवर ईडीने केली कारवाई

नीलांबरी प्रकल्पातील वन बीएचके सदनिका ७५ लाखांची, तर टू बीएचके सदनिका ९५ लाखांपर्यंत आहे. अशा जवळपास १६८ सदनिका या प्रकल्पात आहेत. नीलांबरीचे बांधकाम करणारी श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. ही कंपनी श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची आहे. त्यातील ११ सदनिका मंगळवारी ईडीने सील केल्या.

टॅग्स :मुंबईशिवसेनामनसेसंदीप देशपांडेअंमलबजावणी संचालनालय