Join us

महाराष्ट्र उद्योग भवनाला रतन टाटांचे नाव; उद्योग रत्न पुरस्काराबाबतही मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 3:01 PM

रतन टाटा यांच्या नावाने उद्योग रत्न पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. रतन टाटा यांना जो पहिला उद्योग रत्न

Ratan Tata : नामांकित उद्योजक रतन टाटा यांचं बुधवारी निधन झालं. मुंबईतल्या ब्रीचकँडी रुग्णालयात रतन टाटांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर उद्योग, मनोरंजन, राजकीय विश्वातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. देशासह जगभरातून रतन टाटा यांना आदरांजली वाहिली जात आहे. अशातच महाराष्ट्र सरकारने रतन टाटा यांना श्रद्धाजली वाहण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रतन टाटा यांच्या नावाने उद्योग रत्न पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.  

रतन टाटा यांच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. महाराष्ट्राने रतन टाटा यांच्या निधनानंतर शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. यासोबत महाराष्ट्र शासनाने रतन टाटा यांच्या नावाने उद्योग रत्न पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. तसेच महाराष्ट्र उद्योग भवनाला रतन टाटा यांचं नाव देणार असल्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. उद्योग  मंत्री उदय सामंत यांनी याची माहिती दिली. रतन टाटा यांना जो पहिला उद्योग रत्न पुरस्कार देण्यात आला तो यापुढे रतन टाटा यांच्या नावाने देण्यात येईल, अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. पुढील वर्षापासून हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

"रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार हा महाराष्ट्रामार्फत दिला जाणार आहे. तसेच नरिमन पॉईंट येथे फार मोठं उद्योग भवन उभं करण्यात येत आहे. त्याची रचना ही वेगळ्या पद्धतीने करण्यात येत आहे. त्याची उभारणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून करण्यात येत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या उद्योग भवनाला रतन टाटांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरुन त्यांची स्मृती आणि त्यांचे काम कायमस्वरुपी लोकांच्या लक्षात राहायला हवं," असं उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. 

यासह रतन टाटा यांना निधनानंतर त्यांचे नाव देशाच्या सर्वोच्च सन्मान भारतरत्नसाठी प्रस्तावित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे नाव भारतरत्न पुरस्कारासाठी प्रस्तावित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, रतन टाटा यांचं पार्थिव सध्या अंत्यदर्शनासाठी एनसीपीए येथे ठेवण्यात आलंय. यावेळी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. तसेच उद्धव ठाकरे यांच्यासह पुत्र आदित्य ठाकरे, पक्षाचे नेते अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.

टॅग्स :रतन टाटाएकनाथ शिंदेमहाराष्ट्रउदय सामंत