Join us  

अखेर यूजीसी नेटच्या फेरपरीक्षेची तारीख ठरली; २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर कालावधीत होणार परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 5:28 AM

या परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पेपर लीक झाल्याच्या शक्यतेतून रद्द करण्यात आलेल्या यूजीसी नेट परीक्षेचे सुधारित वेळापत्रक नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) जारी केले आहे. सहायक प्राध्यापक आणि ज्युनिअर रिसर्च फिलोशिप अँड असिस्टंट प्रोफेसर पदासाठी घेण्यात येणारी यूजीसी नेट परीक्षा आता २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. त्यामुळे या परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. 

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक पदासाठी यूजीसी नेट परीक्षा घेतली जाते. यंदापासून प्रथमच या परीक्षेचे गुण पीएच.डी. प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. यापूर्वी जून महिन्यात यूजीसी नेट परीक्षा घेण्यात आली होती. त्यावेळी ९.०८ लाख उमेदवारांनी ही परीक्षा यशस्वीरीत्या दिल्याचे एनटीएने प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी यावरून माघार घेत या परीक्षेत काही गैरप्रकार घडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे नमूद करून ही परीक्षा रद्द केली होती. त्यानंतर पुन्हा कधी परीक्षा होणार याची चिंता विद्यार्थ्यांना लागली होती. 

अखेर एनटीएने तारीख जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. एनटीएकडून २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत ८३ विषयांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेच्या दहा दिवस आधी परीक्षा केंद्र आणि शहराचे नाव विद्यार्थ्यांना सांगितले जाणार असल्याचे सीईटी सेलने जाहीर केले आहे. तसेच सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत परीक्षा पार पडणार आहे. 

टॅग्स :परीक्षा