Join us

उत्तर मध्य मुंबईत भाजपचं धक्कातंत्र?; लोकसभेसाठी उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 1:58 PM

Mumbai North Central: विद्यमान खासदार महाजन यांच्याबाबत मतदारसंघात असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून नवा उमेदवार मैदानात उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

Lok Sabha Election ( Marathi News ) : लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होऊन अनेक आठवडे उलटले असले तरी काही मतदारसंघांमध्ये अद्याप उमेदवारांच्या नावांची घोषणाच करण्यात आलेली नाही. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी पाचव्या टप्प्यात म्हणजे २० मे रोजी मतदाना पार पडणार आहे. मुंबईतील मतदानाला आणखी काही आठवड्यांचा अवधी असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांच्या नावाची निश्चिती करण्यासाठी विचारमंथन सुरू आहे. उत्तर मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघात मागील १० वर्षांपासून भाजपच्या पूनम महाजन या खासदार आहेत. मात्र भाजपने यंदाच्या निवडणुकीसाठी अद्याप त्यांच्या नावाची घोषणा केलेली नाही. महाजन यांच्याबाबत मतदारसंघात असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून नवा उमेदवार मैदानात उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजते. अशातच ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचं नाव चर्चेत आलं असून भाजपकडून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात भाजपकडून सुरुवातीच्या काळात पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा होती. मात्र शेलार यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास असमर्थता दर्शवल्याने पक्षाकडून अन्य नावांवर विचार सुरू आहे. बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचंही नाव चर्चेत होतं. मात्र त्यांनीही निवडणूक लढवण्यास नकार दिल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर आता उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, लोकसभा उमेदवारीबाबत उज्ज्वल निकम यांनी अधिकृतरित्या भाष्य केलं नसून ते याबाबत काय खुलासा करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

उत्तर मध्य मुंबईत काय आहे राजकीय स्थिती?

जुन्या काँग्रेसजनांचा बालेकिल्ला म्हणून एकेकाळी ओळखला जाणारा उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ गेल्या १० वर्षांपासून भाजपच्या हाती आहे. खासदार पूनम महाजन यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत हा मतदारसंघ मिळवला. मात्र मतदारांचा नाराजीचा सूर वरिष्ठांपर्यंत गेल्याने पक्षांतर्गत तसेच विरोधकांच्या टीकेच्या त्या धनी झाल्याने भाजप उत्तर मध्य मुंबईसाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे.

केंद्र व राज्यात सत्ता असूनही २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे मताधिक्य येथे घटले होते. त्यामुळे नवीन तरुण उमेदवार देण्यासाठी भाजपची शोधाशोध सुरू आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नावाचीही येथे चर्चा आहे. यापूर्वी भाजपकडून दोनदा या मतदारसंघाचे सर्वेक्षण झाले आहे. त्यात महाजन यांच्या कामासंदर्भात मतदारांनी नाराजी व्यक्त केल्याने वरिष्ठांना सूचनाही करण्यात आल्या होत्या.  सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे येथील सहा विधानसभा मतदारसंघांतील भाजपची ताकद कमकुवत झाल्याची चर्चा आहे.  

टॅग्स :उज्ज्वल निकममुंबईमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा निवडणूक २०२४भाजपा