मुंबई - राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या सत्तासंघर्षाचा निकाल येत्या काही दिवसांत लागण्याची शक्यता आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेत त्यांच्यासमवेत डीनर केले होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वेगळ्याच राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. त्यामुळे, राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होते की काय, अशी चर्चा रंगली आहे. त्यातच, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनीही सत्तासंघर्षाच्या निकालावर भाष्य केलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. हा निकाल ८ ते १२ मे या काळात येऊ शकतो. कारण, या घटनापीठातील काही न्यायमूर्तीची निवृत्ती लवकरच होत आहे. त्यामुळे, पुढील आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणाची भविष्यातली दिशा ठरवणारा ठरू शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य १५ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. दोन्ही पक्षाच्या वकिलांची बाजू ऐकून झाली असून सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठा आता निकालाच्या अंतिम टप्प्यावर आहे. पुढील आठवड्यात निकाल देण्याची शक्यता आहे. यावर, उज्ज्वल निकम यांनीही भाष्य केलंय.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत निकाल कधी लागेल हे सध्या सांगणे अवघड असले तरी मात्र सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायाधीश, घटनापीठातील न्यायाधीश निवृत्त होणार असल्याने निकाल लवकर लागेल ही अपेक्षा, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. नाशिक येथे साहित्य संमेलनातील एका कार्यक्रमासाठी आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी देखील विधान केले होते. कोर्टाच्या सुट्ट्या सुरु होण्याआधी निर्णय लागला तर राज्यातील परिस्थिती बदलेल असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे, आता निकाल कधी जाहीर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, त्यानंतर बऱ्याच राजकीय स्थित्यंतरांना सुरूवात होणार आहे.
राजकारणात जाणार नाही - निकम
दरम्यान, राजकारणात सध्या जी अस्थिरता आणि गढूळता आहे ती बघून राजकारणात येण्याचा सध्या माझा विचार नाही, मला योग्य वाटत नाही, असेही निकम यांनी स्पष्ट केले.