मुंबईत उकाडा वाढला<bha>;</bha> कमाल तापमानात ४ अंशांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:07 AM2021-01-15T04:07:22+5:302021-01-15T04:07:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असला तरी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील कमाल आणि किमान ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असला तरी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे. मुंबईचे किमान तापमान २२ तर कमाल तापमान ३४ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ४ तर किमान तापमानात ५ अंशांची वाढ झाली असून, पुढील काही दिवस रात्रीसह दिवसाही तापमानात नोंदविण्यात येणारी वाढ कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून मुंबईच्या हवामानात उल्लेखनीय बदल नोंदविण्यात येत आहेत. विशेषत: मध्यंतरी निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबई आणि राज्यात पावसाची नोंद झाली. शिवाय वाऱ्याची दिशा बदलल्याने येथील प्रदूषणात वाढ झाली. आता कमी दाबाचे क्षेत्र विरल्याने पावसाचा जोर ओसरण्यासह मुंबईवरील मळभ हटले आहे. मात्र प्रदूषण कायम नोंदविण्यात येत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून माझगाव, वरळी, बीकेसी, चेंबूर, मालाड, बोरीवलीसह नवी मुंबई प्रदूषित नोंदविण्यात येत आहे. त्यात आता मुंबईतील थंडीचा जोरदेखील ओसरला आहे. किमान तापमान १६ अंशांवरून थेट २२ अंशांवर, तर कमाल तापमान ३० अंशांहून ३४ अंशांवर दाखल झाले आहे.
दिवसासह रात्रीही उष्मा वाढला असून, वाढता उष्मा आणखी काही दिवस तापदायक ठरेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. बुधवारचा दिवस किंचित ‘गरम’ नोंदविण्यात आला असून, मध्य भारतासह महाराष्ट्रात असेच वातावरण होते. विशेषत पुढील पाच ते सहा दिवस उष्मांक वाढता राहील. त्यानंतर विदर्भ येथील किमान तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे. मात्र हे प्रमाण कमी असेल, अशीही शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
* मुंबईकरांना उन्हाच्या झळा
मुंबईचे आकाश गुरुवारीही मोकळे होते. त्यामुळे उन्हाचे चटके बसत होते. कमाल तापमान ३० अंशांवर दाखल झाले असून, त्याचा वाढता पारा मुंबईकरांचा घाम काढत असल्याचे चित्र आहे.