Join us

मुंबईत उकाडा वाढला, तापमानात ५ अंशांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 05:52 IST

मुंबईकरांना उन्हाच्या झळा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असला तरी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे. मुंबईचे किमान तापमान २२ तर कमाल तापमान ३४ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ४ तर किमान तापमानात ५ अंशांची वाढ झाली असून, पुढील काही दिवस ही वाढ कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

आता कमी दाबाचे क्षेत्र विरल्याने पावसाचा जोर ओसरण्यासह मुंबईवरील मळभ हटले आहे. मात्र प्रदूषण कायम नोंदविण्यात येत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून माझगाव, वरळी, बीकेसी, चेंबूर, मालाड, बोरीवलीसह नवी मुंबई प्रदूषित नोंदविण्यात येत आहे. त्यात आता मुंबईतील थंडीचा जोरदेखील ओसरला आहे. किमान तापमान १६ अंशांवरून थेट २२ अंशांवर, तर कमाल तापमान ३० अंशांहून ३४ अंशांवर दाखल झाले आहे.वाढता उष्मा आणखी काही दिवस तापदायक ठरेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.  विशेषत पुढील पाच ते सहा दिवस उष्मांक वाढता राहील. त्यानंतर विदर्भ येथील किमान तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे. मात्र हे प्रमाण कमी असेल, अशीही शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

मुंबईकरांना उन्हाच्या झळामुंबईत गुरुवारीही आकाश मोकळे होते. त्यामुळे उन्हाचे चटके बसत होते. कमाल तापमान ३० अंशांवर दाखल झाले असून, त्याचा वाढता पारा मुंबईकरांचा घाम काढत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :मुंबईउष्माघात