युक्रेनियन महिलेला मिळाले भारताचे हृदय, मुलुंडच्या रुग्णालयातील 50वी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 09:58 PM2017-09-06T21:58:27+5:302017-09-06T21:58:40+5:30
मुलुंडच्या रुग्णालयात एका 32 वर्षीय युक्रेनियन महिला रुग्णाच्या शरीरात दात्याच्या हृदयाचे प्रत्यारोपण केले. जयपूर येथील एका 17 वर्षीय महाविद्यालयीन युवतीच्या पालकांनी तिचे हृदय दान करण्यास संमती दिल्यामुळे ही शस्त्रक्रिया शक्य झाली.
मुंबई, दि. 6 - मुलुंडच्या रुग्णालयात एका 32 वर्षीय युक्रेनियन महिला रुग्णाच्या शरीरात दात्याच्या हृदयाचे प्रत्यारोपण केले. जयपूर येथील एका 17 वर्षीय महाविद्यालयीन युवतीच्या पालकांनी तिचे हृदय दान करण्यास संमती दिल्यामुळे ही शस्त्रक्रिया शक्य झाली. रस्ते अपघातात झालेल्या आघातामुळे ही तरुण ब्रेनडेड झाली होती. तिच्या नातेवाईकांनी मूत्रपिंड, यकृत आणि हृदयाचे दान करण्यास संमती दिल्याने चार रुग्णांचे जीवन समृद्ध होऊ शकणार आहे. ही शस्त्रक्रिया मुंबईतील 59वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ठरली.
जयपूरच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी युवतीला ब्रेनडेड असल्याचे सांगितल्यानंतर तिच्या पालकांचे देहदानाबद्दल समुपदेशन करण्यात आले. पालकांनी मुलीचे अवयवदान करण्याची तयारी दाखवल्यानंतर मुलुंड येथील रुग्णालयातील डॉ. अन्वय मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.
केमोथेरपीमुळे डायलेटेड कार्डिओमायोपथीचा विकार झालेल्या 32 वर्षांच्या युक्रेनियन महिला रुग्णाच्या शरीरासाठी दान करण्यात आलेले हृदय अनुकूल आहे का हे तपासण्यासाठी चाचण्या करण्यात आल्या. या महिलेला असाध्य स्वरूपाचा मायलॉइड ल्युकेमिया झाल्याने केमोथेरपीची अनेक सत्रे घ्यावी लागली होती. ल्युकेमियातून बाहेर येत असतानाच या रुग्णामध्ये हृदयक्रिया बंद पडत चालल्याची लक्षणे दिसू लागली. औषधे आणि वैद्यकीय मदतीच्या आधारावर गेली पाच वर्षे जगत असलेल्या या महिलेची नोंदणी 18 मे 2017 रोजी मुलुंड येथील रुग्णालयात तातडीच्या हृदय प्रत्यारोपणासाठी करण्यात आली. ती तिच्या नवºयासोबत वैद्यकीय उपचारांसाठी भारतात आली.
......................
50 हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
- डॉ. एस. नारायणी
रुग्णालयात 50 हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अविरत काम करणाºया वैद्यकीय पथकांचा खूप अभिमान वाटतो. याबरोबरच मुंबईत हृदय प्रत्यारोपण कार्यक्रम सुरू झाला, त्याला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. तीन आॅगस्ट, 2015 रोजी हृदय प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया झाली होती. आठ वर्षांच्या माधवीपासून ते 62 वर्षांचे साजीद यांच्यापर्यंत अनेक, हृदयाचे कामकाज बंद पडलेल्या रुग्णांची आयुष्य समृद्ध करण्याच्या या कामाला मुंबईकरांनी दिलखुलास मदत केली आहे.
..............................
दुसºया हृदयाने दिले नवे आयुष्य
- सेनीआ शिहोल, युक्रेनियन महिला रुग्ण
हे दुसरे आयुष्य केवळ येथे मिळालेल्या वैद्यकीय मदतीमुळे आहे. सगळ्या आशा हरपून बसले होते पण येथील वैद्यकीय व परिचर्या पथकांनी माझी उमेद जागी ठेवली आणि प्रत्यारोपणाचा प्रवास पार पाडला. दुस-या हृदयामुळे नवे आयुष्यच मिळाल्याची भावना आहे.
.................
जयपूर ते मुंबई अवघ्या तीन तास 18 मिनिटांत
जयपूर आणि मुंबई या दोन शहरांदरम्यान ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आले. दान करण्यात आलेले हृदय दुपारी 3 वाजून पाच मिनिटांनी जयपूरच्या रुग्णालयातून निघाले व 4 वाजून दहा मिनिटांनी जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. एका व्यावसायिक विमानातून 4 वाजून 15 मिनिटांनी मुंबईकडे निघाले. हे हृदय घेऊन येणारी टीम 5 वाजून 31 मिनिटांनी मुंबईला पोहोचली. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून तयार करण्यात आलेल्या ग्रीन कॉरिडॉरमधून 5 वाजून 48 मिनिटांनी हे हृदय मुलुंडच्या रुग्णालयात पोहोचले. 1144 किलोमीटर्सचे अंतर केवळ तीन तास 18 मिनिटांत पार करण्यात आले.