Join us

जलपर्णीच्या वेढ्यातून उल्हास नदी मुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 2:12 AM

महाराष्ट्र दिन : सामाजिक संस्थांनी घेतला पुढाकार, श्रमदानातून केली नदीची स्वच्छता

सदानंद नाईक उल्हासनगर : विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी, महाराष्ट्र दिनानिमित्त एकत्र येत उल्हास नदीतील जलपर्णी काढून नदीची स्वच्छता केली. जलपर्णीमुळे नदीतील हजारो मासे मरण पावल्याने प्रदूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने पाणी उकळून पिण्याची वेळ नागरिकांवर आली होती.

शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीपात्रातून कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी, भाईंदर तसेच ग्रामीण परिसराला पाणीपुरवठा होतो. मात्र, काही वर्षांपासून नदीला जलपर्णी वनस्पतीने विळखा घातल्याने प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला. शहरातील वालधुनी बिरादरी, वज्र संघटना, छावा संघटना, म्हारळ, वरप व कांबा येथील युवक संघटना, द वॉटर फाउंडेशन, मुस्लिम कबरस्तान संघटना, सिटीजन फाउंडेशन आदी सामाजिक संघटनांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त उल्हास नदीच्या स्वच्छतेची हाक दिली होती. या संघटनांचे कार्यकर्ते सकाळी १० वाजता आयडीआय कंपनीजवळ कुदळ, फावडे, घमेले आदी साहित्य घेऊन जमा झाल्यानंतर त्यांनी उल्हास नदी स्वच्छता मिशन सुरू केले.

उन्हाळ्यात नदीपात्रातील पाणी कमी झाल्यावर जलपर्णी वनस्पतीचा विळखा नदीला पडत असून जलपर्णी काढण्यावरून दरवर्षी अनेक आंदोलने झाली आहेत. यावर्षीही जलपर्णी काढण्यासाठी पाटबंधारे विभागासह पालिकांना सामाजिक संस्थेने साकडे घातले होते; मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्यावर सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन नदीतील जलपर्णी काढण्यास सुरुवात केली. सामाजिक संस्थांच्या या श्रमदानामुळे नदी स्वच्छ झाली आहे.

उल्हास नदी स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा निश्चयवालधुनी बिरादरी व वज्र संघटनेचे शशिकांत दायमा हे यानिमित्त म्हणाले की, उल्हास नदी स्वच्छ व सुंदर ठेवणे, हे संघटनेचे उद्दिष्ट आहे. विविध सामाजिक संघटनांनी महाराष्ट्र व कामगारदिनी एकत्र येत उल्हास नदीला जलपर्णीतून मुक्त केले. जलपर्णीमुळे लाखो नागरिकांना प्रदूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.

या प्रदूषणामुळे हजारो मासे तसेच जीवजंतू मृत्युमुखी पडले होते, असेही त्यांनी सांगितले. पाणीपुरवठ्याआड भरमसाट बिल घेणाºया एमआयडीसी, पाटबंधारे विभाग, महापालिकेने जलपर्णी काढण्यासाठी पुढील वर्षी तरी पुढाकार घेऊन नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे, अशी मागणी यावेळी सामाजिक संघटनांनी केली.

टॅग्स :नदी