उल्हासनगर : कॅम्प नं-३ मधील लीला व्हीला इमारतीच्या नेपाळी वॉचमनने ३ साथीदारांच्या मदतीने प्लॅट मध्ये एकट्या असलेल्या ७६ वर्षीय लाजवंती बजाज यांना बांधून घरातून ४ लाख ६० हजार रोख रक्कमेसह सोन्या-चांदीचे दागिने असे एकून ७ लाख ३४ हजाराचा ऐवज लंपास केला. सदर प्रकार शुक्रवारी घडला असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात वॉचमनसह ४ जनावर गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरातील गोल चक्रा गार्डन जवळील लाल व्हीला इमारती मध्ये लाजवंती बजाज हे मुलगा मनोजकुमार, सून व नातवंडासह राहतात. शुक्रवारी लाजवंती बजाज घरी एकट्या असतांना इमारतीचा नेपाळी वॉचमन दीपक खडाका याने पाण्याचा नळ चालू आहे. असा बहाणा करून घरात घुसला. त्यापाठोपाठ त्याचे तीन साथीदार घरात घुसून वृद्ध लाजवंती बजाज यांना जिवेठार मारण्याची धमकी देऊन दोरीने बांधून ठेवले. घरातील कपाटातून ४ लाख ६० हजार रोख रक्कमेसह सोन्या-चांदीचे दागिने असे एकून ७ लाख ३७ हजाराचा ऐवज चोरी करून पोबारा केला. सायंकाळी मुलगा मनोजकुमार पत्नी व मुलासह घरी परतला असता, घराचे दार आतून बंद होते. अखेर घर उघडल्यावर वृद्ध आई लाजवंती यांना बांधून ठेवून वॉचमनने चोरी केल्याचे उघड झाले.
मध्यवर्ती पोलीस ठाण्यात नेपाळी वॉचमन दीपक खडाका याच्यासह त्याच्या ३ साथीदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड करीत आहेत. यापूर्वीही नेपाळी वॉचमनचा आतांक शहरवासीयांनी बघितला आहे. भर रस्त्यावरील मुकुट फायनन्स कार्यालयाचा लाईव्ह दरोड्याचा प्रयत्न काही महिन्यांपूर्वी विठ्ठलवाडी पोलिसांनी हाणून पाडला होता. या दरोडेखोरा मध्ये नेपाळी वॉचमनचा सहभाग असल्याचे उघड होऊन, त्यांच्याकडून गावठी कट्टयासह तलवार, कोयता, गॅस कटर आदी साहित्य जप्त केले होते. त्यापूर्वी भाटिया चौकातील अधोगपती उधावंत यांच्या घरी त्यांच्याच इमारत वॉचमनाने लाखोंची चोरी केली होती. तसेच सार्वजनिक हॉल येथील एका फायनन्स कार्यालयातील कोट्यावधीच्या दरोड्यात इमारतीचा वॉचमनच मुख्य सूत्रधार निघाला होता. असे अनेक प्रताप नेपाळी वॉचमन गॅंगने केल्याचे उघड झाले असून पोलिसांनी त्यांची चौकशी केल्यास मोठे गुन्हे उघड होण्याची शक्यता उघड झाली आहे.
शहरात नेपाळी वॉचमनचा आतंक, गुन्हेगारीत वाढ
शहरातील बहुतांश इमारती मध्ये देखरेखी साठी नेपाळी वॉचमन ठेवले जात असून त्यांची संख्या हजारोच्या संख्येत आहेत. इमारती मध्ये राहणारे नेपाळी वॉचमन हे नावालाच वॉचमन म्हणून काम करतात. त्यांची पत्नी इमारतीच्या अनेक घरात घरकाम तर वॉचमन हे लहान-मोठया हॉटेलात अथवा चायनीज गाडीवर कामे करतात. त्यांच्याकडे नेहमी नातेवाईकांचे येणे-जाणे असून यातूनच चोरी व दरोड्याचे प्रकार घडत आहेत. त्यांची नोंद इमारतीकडे व पोलीस ठाण्यात नसल्याने, भविष्यात मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे..