उल्हासनगर पालिकेला शासनाची चपराक
By admin | Published: February 11, 2016 01:48 AM2016-02-11T01:48:34+5:302016-02-11T01:48:34+5:30
महापालिका गोलमैदान येथील वासू वासवानी उद्यानातील जागा नाममात्र दराने रोटरी क्लबला देण्याचा महासभेचा ठराव शासनाने विखंडित करून चपराक लावली आहे. पालिकेचे
- सदानंद नाईक, उल्हासनगर
महापालिका गोलमैदान येथील वासू वासवानी उद्यानातील जागा नाममात्र दराने रोटरी क्लबला देण्याचा महासभेचा ठराव शासनाने विखंडित करून चपराक लावली आहे. पालिकेचे आर्थिक हित डावलून महासभेने दरमहा १ रुपया दराने हे उद्यान देण्याचा ठराव मंजूर केल्याने तो विखंडित करण्याची विनंती पालिकेने शासनाकडे केली होती. त्यानुसार, शासनाने ८ फेबु्रवारी रोजी हा ठराव विखंडित करून संबंधित नवा प्रस्ताव ३० दिवसांत सादर करण्याचे पालिकेला सुचविले आहे.
उल्हासनगर महापालिकेने २००३मध्ये गोलमैदान येथील साधू वासवानी उद्यानापैकी ५३०० चौमी जागा रोटरी क्लब आॅफ मिडटाऊन संस्थेला १० वर्षांसाठी नाममात्र दराने भाडेतत्त्वावर दिली होती. करारनामा संपुष्टात आल्यावर मिडटाऊन संस्थेने उद्यानाची जागा भाडेतत्त्वावर देण्याची मागणी केली होती. त्यानुसार, पालिकेने एकूण ७८१ चौमी जागेचे दरमहा ९३ हजार ९११ रुपये भाडे निश्चित केले होते. त्यापोटी पालिकेला वार्षिक ११ लाख २६ हजार ९३२ रुपये उत्पन्न मिळू शकेल, असे प्रस्तावात नमूद करून महासभेसमोर तो मंजुरीसाठी ठेवला होता. मात्र, २६ आॅगस्ट २०१४च्या महासभेत पालिका प्रशासनाने मांडलेला भाडेतत्त्वाचा हा प्रस्ताव नगरसेवकांनी उपसूचना दाखल करून अमान्य केला. शिवाय, जागेचे भाडे प्रतिमाह नाममात्र १ रुपया दराने देण्याचा ठराव बहुमताने मंजूर केला.
महासभेने मंजूर केलेला हा
ठराव पालिकेच्या आर्थिक हिताविरोधात असून, तो विखंडित करण्याची विनंती तत्कालीन आयुक्त बालाजी खतगावकर यांनी शासनाकडे केली होती. अखेर, शासनाने पालिका आर्थिक हिताविरोधात ठराव असल्याचे नमूद करून तो विखंडित करून महासभेला चपराक लावली आहे. यासाठी भाजपाचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी, राम चार्ली, जमनुदास पुरस्वानी, मीना आयलानी यांनी नाममात्र दरात देण्यासाठी पुढाकार घेतला होता.
- महापालिकेने रोटरी क्लब संस्थेला गोलमैदानातील
५३०० चौ. मीटरचे उद्यान
नाममात्र १ रुपया दरमहा भाडेतत्त्वावर १० वर्षांसाठी यापूर्वी दिले होते. रोटरी क्लबने करारनाम्यानुसार कार्यक्रम राबविले नसल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्रसिंग भुल्लर यांनी केला होता.
त्या आरोपाला पालिकेने
दुजारा दिला आहे. तसेच संस्थेने दुसऱ्या संस्थेला सदर जागा
लाखो रुपये भाडेतत्त्वावर दिल्याचा प्रकार उघड झाला होता. शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी सदर उद्यान पत्रकार संघाला भाडेतत्त्वावर देण्याची मागणी केली होती. तसा ठराव महासभेत मंजूर झाला होता.