उल्हासनगर महापालिका परिवहन सेवेची मदार केडीएमसीवर
By admin | Published: April 22, 2015 11:43 PM2015-04-22T23:43:31+5:302015-04-22T23:43:31+5:30
महापालिकेने खाजगी ठेकेदारा मार्फत सुरू केलेली परिवहन बस सेवा बंद पडल्यानंतर बस सेवा सुरू करण्यासाठी सिंधू फं्रट संघटनेने उपोषण,
उल्हासनगर : महापालिकेने खाजगी ठेकेदारा मार्फत सुरू केलेली परिवहन बस सेवा बंद पडल्यानंतर बस सेवा सुरू करण्यासाठी सिंधू फं्रट संघटनेने उपोषण, आंदोलन केले होते. त्यामुळे अखेर पालिकेने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मदतीने परिवहन सेवा सुरू करण्याला मंजुरी दिली असून आता बस सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
उल्हासनगर महापालिकेवर शिवसेना-भाजपा पक्षाची सत्ता आल्यावर खाजगी ठेकेदारा मार्फंत परिवहन बस सेवा सुरू केली होती. ठेकेदाराने तिकिट दरात वाढीचा विषय पुढे करीत परिवहन बस सेवा बंद केली. महापालिका अंतर्गत बस सेवा सुरू करण्याची मागणी राजकिय पक्षासह सिंधू फं्रट् संघटनेच्या वतीने करून आंदोलने-उपोषण केले आहे. आमदार रामनाथ मोते यांनीही बस सेवेची मागणी राज्य शासनाकडे लावून धरली आहे.
महापालिकेचे तत्कालिन आयुक्त बालाजी खतगावकर, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त जमीर लेंगरेकर आदीनी कल्याण-डोंबिवली पालिका परिवहन बस सेवेच्या मदतीने शहर अंतर्गत बस सेवेला मंजुरी दिली आहे. शहरातील १४ बस मार्गासह बस थांब्याची माहिती केडीएमसी परिवहन समितीला उपायुक्त लेंगरेकर यांनी दिली आहे. मुख्य ७ मार्गावर तात्काळ परिवहन बस सेवा सुरू करण्याचे आदेश पालिकेने दिले आहे.
महापालिकेची परिवहन बस सेवा बंद पडल्याने शेकडो कामगार बेकार झाले असून त्यांना पालिका परिवहन सेवेत सामाविष्ट करण्याची मागणी कामगार संघटनेचे नेते अरूण आशान यांनी केले आहे. कामगाराची विविध देणी दिली नसल्याने ती प्रथम देण्याची तसेच पालिका परिवहन समिती बरखास्त करण्याची मागणीही आशान यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. केडीएमसीच्या मदतीने परिवहन बस सेवा सुरू होत असल्याने सिंधू फ्रंटने समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)