Join us

उल्हासनगर पालिकेची गच्चीवरील शाळा हलविणार, अधिकाऱ्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 12:19 AM

खाजगी शाळेच्या टरेसवर भरविण्यात येत असलेली महापालिका शाळा मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दुसरीकडे हलविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी भाऊराव मोहिते यांनी दिली.

उल्हासनगर : खाजगी शाळेच्या टरेसवर भरविण्यात येत असलेली महापालिका शाळा मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दुसरीकडे हलविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी भाऊराव मोहिते यांनी दिली.उल्हासनगर कॅम्प नं-२ परिसरात महापालिकेची मराठी व हिंदी माध्यमाची शाळा क्रं-१८ व २४ आहे. शाळेच्या इमारतीला गळती लागून धोकादायक झाल्याने पुनर्बांधणीच्या प्रस्तावाला पालिकेने मंजुरी दिली. ४ कोटीपेक्षा जास्त निधीतून पुनर्बांधणी होणार आहे. मात्र नवीन शहर विकास आराखडयानुसार शाळेच्या इमारतीचा काही भाग लिंक रोडमध्ये येत असल्याने शाळेचे बांधकाम नियमा नुसार करण्यााची मागणी झाली. त्याकडे दुर्लक्ष करून उन्हाळयात शाळा इमारत जमीनदोस्त करून तब्बल ९५० विद्यार्थ्यांना शेजारील खाजगी शाळेत हलविण्यात आले. शाळेत पुरेसे वर्ग उपलब्ध नसल्याने खाजगी शाळेच्या गच्चीवर कापड टाकून त्याखाली मुलांना शिकवले जात होते.शिक्षण मंडळाने मुलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून चक्क इमारतीच्या गच्चीवर मुलांचा वर्ग भरत असल्याचे उघड झाले. या प्रकाराने शिक्षण मंडळासह महापालिकेवर आरोप-प्रत्यारोप होऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, शाळा इमारत रस्त्याच्या कामामुळे बाधित होणार असल्याच्या असंख्य तक्रारी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे आल्यावर त्यांनी शाळा इमारतीचा बांधकाम परवाना रद्द केला. त्यामुळे पुनर्बांधणीचा प्रश्न ऐरणीवर आला. शाळा इमारतीच्या बांधकामाला नगररचनाकार व बांधकाम विभागाने परवानगी दिली नसल्याचे उघड झाले आहे.उल्हासनगर पालिकेच्या शिक्षण विभागातील सावळागोंधळ याआधीही उघड झाला आहे. एकूणच पालिकेच्या सर्व विभागात समन्वय नसल्याने विकासकामांमध्ये सातत्याने अडथळे येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.शैक्षणिक भवितव्य अंधारातमहापालिका व शिक्षण मंडळाच्या धरसोड वृत्तीमुळे शेकडो गरीब व गरजू मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात सापडले आहे. शिक्षण मंडळ नेहमी वादात सापडत असून महापालिका शाळेतील मुलांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. दहा वर्षापूर्वी पालिका शाळेतील मुलांची संख्या १२ हजारापेक्षा जास्त होती. सध्या मुलांची संख्या ५ हजारावर येऊन ठेपली आहे. 

टॅग्स :उल्हासनगरशाळाशिक्षण क्षेत्र