Join us  

उल्हासनगरला यापुढे दोनच दिवस पाणी

By admin | Published: March 10, 2017 4:09 AM

उल्हासनगरचा पाणीपुरवठा सध्या एमआयडीसीकडून एक दिवस बंद असल्याने दिवसाआड पाणीपुरवठा होत असतानाच पाटबंधारे विभागाने आणखी एक दिवस

उल्हासनगर : उल्हासनगरचा पाणीपुरवठा सध्या एमआयडीसीकडून एक दिवस बंद असल्याने दिवसाआड पाणीपुरवठा होत असतानाच पाटबंधारे विभागाने आणखी एक दिवस पाणीकपात करण्यास सुचवल्याने पाणीपुरवठ्याचा प्रश्न गेल्यावर्षीसारखाच गंभीर बनला आहे. तसे झाल्यास आठवड्यातून फक्त दोन दिवस पाणी मिळेल, अशी स्थिती आहे. त्यामुळे शहरात संतापाची लाट असून अशी परिस्थिती निर्माण झाल्यास उल्हासनगरात पाण्यावरून संघर्ष पेटण्याची स्थिती आहे. त्यामुळे जलसंपदामंत्र्यांकडे शुक्रवारी होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा पाऊस चांगला होऊनही जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठयाचे कारण पुढे करून आणखी एक दिवस पाणीकपात होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. पाणी वितरणातील दोषामुळे पालिका सध्या दिवसाआड पाणीपुरवठा करीत आहे. सध्या एमआयडीसीने शुक्रवारी २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवला आहे. त्यातच पाटबंधारे विभागाने एक दिवस कपात केल्यास शहरात हाहाकार उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी बोलावलेल्या बैठकीत वाढीव पाणी मिळते का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने अवघी पाच टक्के पाणीकपात करावी लागेल, असे सुरूवातीपासून सांगितले जात होते. मात्र वाढलेली बांधकामे, बेकायदा पाणीपुरवठा, प्रचंड प्रमाणात होणारी पाणीगळती-चोरी अणि टँकर लॉबीचा प्रभाव यामुळे गरजेपेक्षा जास्त पाणी पुरवूनही कोणत्याच शहराला पाणी पुरत नाही, अशी स्थिती आहे. सुरूवातीला अठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवून म्हणजे सात टक्के कपात करून जुलैपर्यंत पाणी पुरवले जाईल, असे सांगितले जात होते. पण यंदा उन्हाची तीव्रता अधिक असल्याने बाष्पीभवनाचे प्रमाणही अधिक असेल हे गृहीत धरून ही कपात वाढवण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यातच अनेक पालिका गरजेपेक्षा जास्त पाण्याचा उपसा करीत असूनही त्यांच्यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने जलपातळी खूप कमी होऊ लागल्याने टंचाई वाढली आहे. (प्रतिनिधी)एमआयडीसीच जबाबदारपाणीटंचाईच्या निषेधार्थ नागरिक रस्त्यावर उतरले असून निवडणूक संपताच पाणीटंचाई कशी सुरू झाली, असा त्यांचा सवाल आहे. आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी शहरातील परिस्थिती बिघडल्याचे सांगत या प्रकाराला एमआयडीसीला जबाबदार असल्याचे पत्र दिले आहे.मंत्रालयात ठिय्या : कलानी महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी एमआयडीसीचे अधिकारी, आमदार ज्योती कलानी, महापौर, स्थायी समिती सभापतींसह गटनेत्यांची बैठक बोलाविली होती. त्यात एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. काहीही पूर्वकल्पना न देता जलवाहिन्यांची दुरूस्ती हाती घेतलीच कशी, असा प्रश्न केल्यावर चार दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसे न झाल्यास मंत्रालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आमदार कलानी यांनी दिला.गिरीश महाजन यांच्याकडे आज बैठक पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार बालाजी किणीकर, आमदार ज्योती कलानी व इतर आमदारांनी मंत्रालयाच्या पायऱ्यांवर उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण-डोंबिवलीतील २७ गावांच्या वाढीव पाणीपुरवठ्यासाठी आंदोलन केले. त्यामुळे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पाटबंधारे विभागासह पालिका अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी बोलावली आहे. त्यात वाढीव पाणीपुरवठ्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.