उल्हासनगरात २५०० श्वानांचे होणार निर्बिजीकरण
By admin | Published: February 19, 2015 11:08 PM2015-02-19T23:08:51+5:302015-02-19T23:08:51+5:30
शहरातील २५०० मोकाट कुत्र्याच्या निर्बिजिकरणाची मोहिम पालिकेने आठ वर्षानंतर हाती घेतली आहे. २ ते ३ वर्षात कुत्र्याची संख्या अर्ध्यावर आणण्याचा मानस आहे.
सदानंद नाईक ल्ल उल्हासनगर
शहरातील २५०० मोकाट कुत्र्याच्या निर्बिजिकरणाची मोहिम पालिकेने आठ वर्षानंतर हाती घेतली आहे. २ ते ३ वर्षात कुत्र्याची संख्या अर्ध्यावर आणण्याचा मानस आहे. त्यासाठी ३० लाखाची तरतुद केली आहे. तर मार्च महिन्यात निर्बिजिकरणाला सुरूवात होणार असल्याचे पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी सांगितले आहे.
उल्हासनगरात कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. महिन्याला ४०० नागरिकांना कुत्रा चावल्याची नोंद मध्यवर्ती रूग्णालयात झाली आहे. शहरात १० हजारांपेक्षा जास्त कुत्र्याची संख्या असून पालिकेच्या २०१२ च्या पशुगणनेनुसार कुत्र्यांची संख्या ३६३८ दाखविली आहे. परिसरातील बहुतांश कचरा कुंडया रस्त्यात कच-याने भरून वाहत आहेत.
मोकाट कुत्र्याच्या संख्येवर नियंत्रणाची मागणी नगरसेवकासह नागरीकांनी पालिका आयुक्ता कडे वांरवांर केली आहे. कुत्र्याच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी पालिका आरोग्य विभागाने निर्बिजिकरणाची मोहिम हाती घेतली आहे. मात्र ठेकेदार मिळत नसल्याने मोहिम गेल्या आठ वर्षापासून ठप्प पडली आहे. अखेर निर्बिजिकरणासाठी ठेकेदार मिळाला असून मार्च महिन्या पासून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. ज्या विभागातून कुत्र्याला पकडले जाणार आहे. त्याच विभागात निर्बिजिकरणा नंतर सोडण्यात येणार आहे.
निर्बिजिकरण केलेल्या कुत्र्याच्या कानावर व्ही मार्क करून रेबिजचे प्रतिबंधात्मक लस देणेही कंत्राटदाराला बंधनकारक आहे. तसेच ५ दिवस कुत्र्याची देशभाल व औषधोपचार ठेकेदाराला करावा लागणार आहे. पालिकेने सन-२००५-०६ मध्ये खाजगी ठेकेदारा मार्फत २००० कुत्र्याची नसबंदी केली आहे. पालिकेकडे स्वत:चे पशु रूग्णालय व पशु वैद्यकिय अधिकारी तसेच कुत्रे पकडणारे पथक नसल्याने कुत्र्याच्या संख्येला आळा घालण्यासाठी व नसबंदी साठी खाजगी ठेकेदारावर अवलंबून राहावे लागत आहे.
महापालिका श्वान दंशावरील लसी नागरीकासाठी उपलब्ध करून देत असुन त्यावर लाखोंचा खर्च होत आहे. कुत्र्याच्या नसबंदीचा कार्यक्रम कमीतकमीत दोन ते तीन वर्ष सुरू ठेवण्याचा मानस पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी व्यक्त केला आहे. दोन ते तीन वर्ष निर्बिजिकरणाची मोहिम सुरू ठेवल्यास कुत्र्याची संख्या ५० टक्के कमी होण्याचे संकेत आरोग्य विभागाने दिले आहे. कुत्र्याचे निर्बिजिकरण होऊन त्याच्या संख्येवर आळा बसणार असल्याने नागरिकही सुटकेचा नि:श्वास टाकतील. मात्र ही मोहिम किती काळ सुरु राहील याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.