मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांतील अतिदक्षता विभागाचे अखेर खासगीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 12:48 AM2020-01-31T00:48:15+5:302020-01-31T00:48:25+5:30
गेल्या दीड वर्षापासून लांबणीवर टाकलेल्या या प्रस्तावाला गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
मुंबई : तज्ज्ञ डॉक्टर आणि निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने पालिका रुग्णालयातील अतिदक्षता विभाग खासगी संस्थेमार्फत चालविण्यात येणार आहे. गेल्या दीड वर्षापासून लांबणीवर टाकलेल्या या प्रस्तावाला गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मात्र अतिदक्षता विभागात उपचार करणारे खासगी डॉक्टर पालिकेच्या यंत्रणेचा वापर करून आपले खिसे भरतील, अशी भीती सदस्यांनी व्यक्त केली.
गरीब रुग्णांवर मोफत उपचार करून दिलासा देणाºया पालिका रुग्णालयांत डॉक्टरांअभावी अतिदक्षता विभाग बंद पडले आहेत. त्यामुळे खासगी डॉक्टरांची सेवा घेण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीत २०१८ मध्ये मांडला होता. मात्र यापैकी काही रुग्णालयांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले होते. तरीही प्रशासनाने गेल्या महिन्यात गटनेत्यांच्या बैठकीत अतिदक्षता विभागाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर स्थायी समितीमध्येच चर्चा व्हावी, अशी भूमिका घेत गटनेत्यांनी प्रस्ताव नाकारला होता. त्यानुसार गुरुवारी प्रशासनाने पुन्हा हा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडला.
या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आक्षेप घेत यापूर्वी खासगी सेवा घेण्यात आलेल्या अतिदक्षता विभागाचा अहवाल मागवावा, अशी मागणी केली. तसेच या प्रस्तावाला विरोध दर्शवत फेरविचाराची सूचना केली. पालिका रुग्णालयांत चतुर्थ श्रेणीतील कामगारांची कमतरता आहे. तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने अतिदक्षता विभाग बंद ठेवावे लागत आहेत. यामुळे गरीब रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी भरती करा, अशी मागणी शिवसेनेच्या राजुल पटेल यांनी केली. सर्व यंत्रणा पालिकेची वापरून खासगी डॉक्टर आपल्या रुग्णांना येथे आणतील. त्यामुळे धोरणात बदल करण्याची मागणी सदस्यांनी केली. मात्र सदस्यांच्या विरोधानंतरही डॉक्टरांच्या कमतरतेमुळे प्रस्ताव स्थायी समितीत एकमताने मंजूर करण्यात आला.
अशा आहेत अडचणी
पालिकेच्या उपनगरी रुग्णालयांत तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे प्रत्येक सहा महिन्यांच्या कालावधीने भरली जातात, मात्र डॉक्टर उपलब्ध न झाल्याने ही पदे रिक्त राहतात. निवासी डॉक्टर सोडून जाण्याचे प्रमाणही अधिक आहे.
अतिदक्षता विभागात हृदयरोग विकासतज्ज्ञ, मेंदू शल्यक्रिया तज्ज्ञ, मूत्रपिंड विकारतज्ज्ञ अशा सुपरस्पेशालिटी तज्ज्ञांची सेवा उपलब्ध होत नाही. उपनगरी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर नाहीत.
येथे अतिदक्षता विभागात खासगी सेवा
रुग्णालयांचे नाव खाटा
भाभा, वांद्रे १२
व्ही.एन. देसाई, विलेपार्ले २०
ट्रॉमा, जोगेश्वरी २०
सिद्धार्थ, गोरेगाव (प.) १२
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
रुग्णालय, कांदिवली (प.) ३०
भगवती, बोरीवली १०
राजावाडी, घाटकोपर २१
भाभा, कुर्ला १०
संत मुक्ताबाई, घाटकोपर १०
एम.एम. मालविया, गोवंडी २०
के.एम.जी. फुले, विक्रोळी १०
एम.टी. अग्रवाल, मुलुंड २५