अखेर बेस्टच्या ताफ्यात ३०३ बसेस येणार
By admin | Published: March 26, 2017 05:43 AM2017-03-26T05:43:35+5:302017-03-26T05:43:35+5:30
अखेर तीन महिन्यांच्या विलंबानंतर ३०३ नवीन बसगाड्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार आहेत
मुंबई : अखेर तीन महिन्यांच्या विलंबानंतर ३०३ नवीन बसगाड्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार आहेत. अत्याधुनिक सोयी असलेल्या या बसगाड्या बेस्टची गती वाढवतील. त्यामुळे बस थांब्यावर तिष्ठत राहणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात चार हजारांहून अधिक बसगाड्या आहेत. मात्र यापैकी बहुतेक बसगाड्यांची वयोमर्यादा उलटून गेल्यामुळे बेस्ट उपक्रमाने नवीन बसगाड्या घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार टाटा कंपनीला बसगाड्यांचे कार्यादेश डिसेंबर महिन्यात देण्यात आले. परंतु जानेवारी अखेरीपर्यंत एकही बसगाडी नमुनादाखल बेस्ट ताफ्यात आली नाही. याचे तीव्र पडसाद बेस्ट समितीच्या बैठकीत उमटले होते.
अखेर एप्रिल २०१७चे टार्गेट पाळत या बसगाड्या बेस्टच्या आगारांमध्ये लवकरच येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या बसगाड्यांमध्ये मोबाइल चार्जर, वायफाय आदी सेवा उपलब्ध असणार आहेत. जुन्या बसगाड्या रस्त्यातच बंद पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. मात्र नवीन बसगाड्या रस्त्यावर आल्याने बसफेऱ्या वाढून प्रवाशांची प्रतीक्षा संपेल. (प्रतिनिधी)
लेडिज स्पेशल
महिला प्रवाशांचा आकडाही मोठा असल्याने त्यांच्यासाठी लेडिज स्पेशल बस सुरू करण्याचा विचार आहे. त्यानुसार, या नवीन बसगाड्यांमधील काही बसगाड्या महिलांसाठी राखीव असतील. तेजस्विनी योजनेंतर्गत या बसगाड्या चालविण्यात येतील.
१२ मीटर आकार असलेल्या या प्रत्येक बसगाडीची किंमत ५५ लाख रुपये पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी बसगाडीमध्ये आॅटोमेटिक ट्रान्समिशन ड्रायव्हर कॅबिनमध्ये स्पेशल घोषणा यंत्र आठ मोबाइल चार्जर प्लग बसगाड्यांमध्ये एण्ट्री व एक्झिटच्या दरवाजांची रुंदी वाढविण्यात येणार आहे.