अखेर बेस्ट वादग्रस्त ‘कॅनेडियन’ वेळापत्रक गुंडाळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 05:55 AM2017-11-29T05:55:10+5:302017-11-29T05:55:30+5:30
बेस्टच्या उत्पन्नात वाढ करण्याचा आणखी एक प्रयोग सपशेल आपटला आहे. कामगारांच्या विरोधानंतरही गेली तीन वर्षे बेस्टमध्ये कार्यरत असलेले वादग्रस्त कॅनेडियन वेळापत्रक अखेर गुंडाळण्याची तयारी बेस्ट प्रशासनाने सुरू केली आहे.
मुंबई : बेस्टच्या उत्पन्नात वाढ करण्याचा आणखी एक प्रयोग सपशेल आपटला आहे. कामगारांच्या विरोधानंतरही गेली तीन वर्षे बेस्टमध्ये कार्यरत असलेले वादग्रस्त कॅनेडियन वेळापत्रक अखेर गुंडाळण्याची तयारी बेस्ट प्रशासनाने सुरू केली आहे. विशेष म्हणजे या तीन वर्षांत या संगणक प्रणालीवर चार कोटी रुपये खर्च केल्यानंतर बेस्टला हा साक्षात्कार झाला आहे.
बेस्ट उपक्रमाचे बरेच बसमार्ग तोट्यात आहेत. त्यामुळे बसगाड्यांचे वेळापत्रक संगणकीय प्रणालीद्वारे तयार करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने २०१४ मध्ये घेतला. या नवीन संगणकीय वेळापत्रकामुळे बेस्ट चालक व वाहकांना शिस्त आणि बेस्टच्या उत्पन्नात वाढ होईल, असा दावा करण्यात आला. या नवीन वेळापत्रकाला कामगार संघटनांनी तीव्र विरोध केला होता. तरीही कॅनेडियन वेळापत्रक बेस्टच्या २७ बस आगारांमध्ये सुरू राहिले. मात्र याचा कोणताही आर्थिक फायदा बेस्टला झाला नाही. याउलट तुटीत असलेल्या अनेक बसमार्गांवर बसगाड्या रिकाम्या धावत होत्या. त्यामुळे १ डिसेंबरपासून संगणकीकृत वेळापत्रक तयार करण्याची पद्धत रद्द करून पुन्हा पूर्वीप्रमाणेच वाहतूक विभागाच्या नियोजन विभागामार्फतच यापुढे बसगाड्यांचे वेळापत्रक तयार होईल. यामुळेच वेळापत्रकाला विरोध
कॅनेडियन कंपनीमार्फत मुंबईच्या बसगाड्यांचे वेळापत्रक तयार होणे यावरच कामगार संघटनांचा विरोध होता. या वेळापत्रकानुसार कामगारांना १२ तासांनी ब्रेक मिळत असे. त्यामुळे पूर्व उपनगराच्या टोकाला राहणारा बसचालक घरी जाऊन ड्यूटीवर येणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला होता.
उर्वरित बस आगारांमध्येही अंमल
बेस्टच्या वाहतूक विभागामार्फतच १ डिसेंबरपासून वेळापत्रक तयार होईल, असे बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकिळ यांंनी अर्थसंकल्पीय भाषणातून जाहीर केले होते. १७ बस आगारांमध्ये ही पद्धत या आधीच बंद करण्यात आली असून उर्वरित दहा बस आगारांमध्ये लवकरच यावर अंमल होणार आहे.