अखेर 'दोस्ती' जिंकली, उदयनराजेंकडून शशिकांत शिंदेंना 'जादू की झप्पी'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 12:24 PM2019-12-04T12:24:38+5:302019-12-04T15:53:37+5:30
उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला.
सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसलेंच्या दिल-दोस्ती-दुनियादारीची चर्चा साताऱ्यात असते. मात्र, पक्षनिष्ठेला वाहून घेतलेल्या शशिकांत शिंदेंनी उदयनराजेंच्या पराभवासाठी मेहनत घेतली. तर, कोरेगाव मतदारसंघात शशिकांत शिंदेंना पाडण्यासाठी उदयनराजेंनी शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार केला. निवडणुकांच्या या रणभूमित दोन्ही नेत्यांनी आपल्या पक्षनिष्ठेला प्राधान्य दिले. त्यामुळे दोस्त दोस्त न रहा... अशी परिस्थिती निवडणूक काळात दिसून आली होती.
उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे शशिकांत शिंदेंनी उदयनराजेंनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजेंनी मित्राचं ऐकलं नाही किंवा राजेंना थांबविण्यात शिंदेंना अपयश आले. त्यामुळे निवडणूक काळात हे सख्खे मित्र पक्के वैरी बनल्यासारखं दिसून आलं. दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरुद्ध दंड थोडपट पक्षाची भूमिका पार पाडली. त्यामुळे दोघांचाही आपल्या-आपल्या मतदारसंघातून पराभव झाले. उदयनराजे खासदारकीला पराभूत झाले तर शशिकांत शिंदे आमदारकीच्या निवडणुकीत हारले. निवडणूक काळात हे दोन्ही मित्र एकमेकांपासून दूर गेले होते.
निवडणुकीच्या धामधुमीनंतर दोन्ही नेत्यांची पहिल्यांदाच लग्नसोहळ्यात भेट झाली. निवडणुकीच्या दीड महिन्यानंतर, शेंद्रे येथे एका लग्न सोहळ्याच्या निमित्ताने दोघेही समोरासमोर आल्यावर निवडणुकीतील ही दुश्मनी एका मिठीत सामावून गेली. त्यानंतर, या भेटीचीच चर्चा गावकुसात रंगली होती. विशेष म्हणजे उदयनराजेंनी शशिकांत शिंदेंना मिठी मारत, ''आता सोडणार नाही'' असेही उद्गार काढले. या भेटीमुळे राजकीय दुश्मनीपेक्षा पुन्हा मैत्रीच श्रेष्ठ असल्याचं महाराष्ट्राने पाहिलं. या दोन्ही नेत्यांची गळाभेट सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांना मैत्री जपण्याचा आदर्श घालून देणारी आहे.