ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - टाटा सन्सच्या चेअरमनपदावरुन सायरस मिस्त्री यांना हटवल्यापासून सुरु झालेल्या कॉर्पोरेट वादावर अखेर रतन टाटा यांनी शुक्रवारी मौन सोडले. माझ्यावर आणि टाटा समूहावर झालेले आरोप खोटे आणि तथ्यहीन आहेत.
या आरोपांमुळे वेदना झाली. मागच्या दोन महिन्यात माझी व्यक्तीगत प्रतिमा मलिन करण्याचे ठोस प्रयत्न झाले. पण शेवटी सत्याचा विजय होईल असे रतन टाटा यांनी म्हटले आहे. टाटा केमिकल्सच्या शेअरहोल्डर्सच्या सर्वसाधारण सभेमध्ये ते बोलत होते. पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी शेअरहोल्डर्सचे आभार मानले. टाटा समूहाची 150 वर्षांपासून सुशासन आणि प्रामाणिकपणाच्या आधारावर वाटचाल सुरु आहे.
सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या चेअरमनपदावरुन हटवल्यानंतर त्यांनी रतन टाटांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. टाटा सन्समध्ये गैरव्यवस्थापन असून कॉर्पोरेट गव्हर्नन्स अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. टाटा सन्सच्या चेअरमनपदावरुन सायरस मिस्त्री यांना हटवल्यानंतर त्याजागी रतन टाटा यांची हंगामी अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.