मुंबई : मध्य व पश्चिम रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या दादरचे नामांतर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस’ असे करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. भीम आर्मी या सामाजिक संघटनेने रेल्वेमंत्री पीयूष गोयल तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी यासंदर्भात निवेदन दिले आहे. तसेच ६ डिसेंबरपूर्वी या प्रश्नी निर्णय न घेतल्यास मुख्यमंत्र्यांना चैत्यभूमीवर पाय ठेवू देणार नाही, असा इशाराच भीम आर्मीने दिला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च विद्याविभूषित होते, म्हणूनच कोलंबिया विद्यापीठाने जगातील सर्वांत विद्वान व्यक्ती म्हणून गौरव करीत त्यांचा पुतळा कोलंबिया विद्यापीठाबाहेर उभारला आहे. दादर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभूमी आहे. त्यांचे निवासस्थान राजगृह तसेच आंबेडकरी चळवळीचे केंद्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनदेखील याच दादर परिसरात आहे. म्हणून दादरचे नामांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस म्हणून करण्याची मागणी संघटनेने केल्याचे भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी सांगितले.केंद्र सरकारने दादर चैत्यभूमीजवळील इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्याप तेथे स्मारकाच्या कामाची एक वीटदेखील रचलेली नाही. आघाडी सरकारने केलेल्या कामाचे फक्त भूमिपूजन करण्याचे काम भाजपा सरकार करीत आहे, अशी टीका भीम आर्मीने केली आहे. याआधी भीम आर्मीने ६ डिसेंबर २०१७ व १४ एप्रिल २०१७ रोजी दादरचे प्रतीकात्मक नामांतर करून या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले होते. तसेच पत्रव्यवहारही केला होता. मात्र, अद्यापही मागणी प्रलंबित असल्याची खंत भीम आर्मीने व्यक्त केली.
दादरच्या नामांतरासाठी ६ डिसेंबरचा अल्टिमेटम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 6:12 AM