मुंबई : तापमान, आर्द्रता, हवेचा वेग, दिशा अशी १५० शहरांसाठीची माहिती आता दिवसातून ८ वेळा अद्ययावत करण्यात येत आहे. याशिवाय सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्र, सूर्याविषयी माहितीही नागरिकांना घरबसल्या मिळावी यासाठी भारत सरकारने ‘उमंग’ हे मोबाइल अॅप सुरू केले आहे.
युनिफाइड मोबाइल अॅप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स (उमंग)चे उद्घाटन नुकतेच करण्यात आले असून, आयएमडीच्या संकेतस्थळावरील ७ सेवा उमंग अॅपवर उपलब्ध आहेत. अल्पकालीन पूर्व अनुमानाअंतर्गत स्थानिक हवामान घटनेविषयी आणि त्याच्या तीव्रतेचा इशारा आयएमडीच्या राज्य हवामान केंद्राद्वारे सुमारे ८०० स्थानके आणि भारतातील जिल्ह्यांसाठी तीन तास आधी दिला जात आहे. हवामान जास्त प्रतिकूल असल्यास त्याचा इशाराही मिळणे शक्य झाले आहे.
‘शहराचा अंदाज’ या अंतर्गत देशातील सुमारे ४५० शहरांमधील मागील २४ तास आणि ७ दिवसांच्या हवामानाचा अंदाज दिला जात आहे. देशभरातील सर्व जिल्ह्यांतील पावसाची माहिती दैनिक, साप्ताहिक, मासिक आदी स्वरूपात उपलब्ध आहे. याशिवाय देशातील जवळपास १०० पर्यटन स्थळांचा मागील २४ तासांचा आणि ७ दिवसांतील हवामानाचा अंदाज वर्तविला जात आहे.
चक्रीवादळाचा मिळतो इशारा
हवामानाच्या विविध धोकादायक पातळ्या दर्शविण्यासाठी लाल, नारंगी आणि पिवळ्या रंगांचा वापर करण्यात येतो. लाल रंग हा सर्वांत धोकादायक परिस्थिती दर्शवितो. आगामी पाच दिवसांसाठीची अशी माहिती सर्व जिल्ह्यांत दिवसातून दोनदा जारी केली जाते.याशिवाय चक्रीवादळाचा मागोवा घेता येतो. त्याची संभाव्य वेळ आणि किनारपट्टी ओलांडण्याचा कालावधी समजल्यामुळे असुरक्षित क्षेत्र रिकामे करण्यासह योग्य तयारी करता येते.