प्रेमाची नाळ: अवघ्या एक मिनिटात ती जगली ३४ वर्षांचे आयुष्य, म्हणून तिने बाळाला जन्म दिला नव्हता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 11:51 AM2024-01-02T11:51:49+5:302024-01-02T11:53:19+5:30
...भेटीचा योग आला; मात्र आईला भेटण्यासाठी मिळाले अवघे एक मिनिट आणि या एका मिनिटातच या मायलेकीने न बोलताच ३४ वर्षांचा संवाद साधला. आईच्या भेटीनंतर डिसेंबर महिन्यात तिने एका गोड मुलीला जन्म दिला आहे.
मुंबई : विधवा असताना मुलीचा जन्म झाला म्हणून काळजावर दगड ठेवत जन्मदात्या आईने तिला संस्थेत सोडले. बेल्जियमच्या दाम्पत्याने तिला दत्तक घेतले. दोन वर्षांपूर्वी तेथीलच एका तरुणाशी तिचा विवाह झाला; मात्र खरी आई कोण? याचे उत्तर मिळत नाही तोपर्यंत स्वतः आई न होण्याचा निर्णय घेत जन्मदात्रीचा शोध सुरू केला. तिचा हा शोध प्रवास ३४ वर्षांनी संपला. भेटीचा योग आला; मात्र आईला भेटण्यासाठी मिळाले अवघे एक मिनिट आणि या एका मिनिटातच या मायलेकीने न बोलताच ३४ वर्षांचा संवाद साधला. आईच्या भेटीनंतर डिसेंबर महिन्यात तिने एका गोड मुलीला जन्म दिला आहे.
मूळची अमरावतीची अनुजा. ८८ मध्ये जन्म झाला. विधवा असताना मुलीचा जन्म झाला म्हणून जन्मदातीने अमरावतीच्या संस्थेकडे सोपविले. ८९ मध्ये मुलीला बेल्जियम दांपत्याने स्वीकारले. शिक्षण घेत ती फोटोग्राफर बनली; मात्र १५ वर्षांपासून आई कोण? ती कशी असेल? असे अनेक प्रश्न तिला अस्वस्थ करू लागले. २०१५ मध्ये ॲडॉप्टी राइट्स कौन्सिलच्या मदतीने मदतीने शोध सुरू केला. संस्थेच्या संचालिका ॲड. अंजली पवार सांगतात, सुरुवातीला संस्थेकडून माहिती मिळविण्यास अडचणी आल्या. अखेर प्रयत्नांती आईचे नाव व पत्ता मिळाला. महिलेला विश्वासात घेत डीएनए मिळविला. अहवाल सकारात्मक येताच भेटीचा दिवस ठरला. गावासारख्या ठिकाणी कुणाला काही न समजता दोघींची भेट घडवून आणण्याचे आव्हान होते. गावच्या घरातच भेटीचे ठरविले. १० गावांत सर्व्हे सुरू असल्याचे सांगून तिचा नवरा कॅमेरामन बनला. फॉरेनरला पाहून सारेजण त्याच्यामागे जाऊ लागले. अखेर आईचे घरातील सर्व मंडळी सर्व्हेसाठी बाहेर पडताच या दोघी समोरासमोर आल्या.
न बोलताच संवाद
घरात कोणी येण्याच्या आत त्या आईला हे सांगायचं होत ही तुमची मुलगी आणि हा जावई. त्यांना ही तुमची मुलगी सांगताच, हो माय कडले मला. सुखी राहा. हा तुमचा जावई. दोघींनी मिठी मारली. आईला पाहून तरुणीचे अश्रू थांबत नव्हते. तिला खूप काही बोलायचे होते; मात्र अवघ्या मिनिटांतच एक नातेवाईक घरात आले. अवघ्या एक मिनिटाच्या संवादात त्यांनी मात्र ३४ वर्षांचा संवाद न बोलताच पूर्ण केला.
अन् तिने मुलीला जन्म दिला...
आईशी दोनदा भेट झाली. आईची भेट होत नाही तोपर्यंत बाळाला जन्म देणार नाही, असा निर्णय तिने घेतला होता. अखेर, आईच्या भेटीनंतर डिसेंबरमध्ये तिने गोड अशा मुलीला जन्म दिला आहे. आपली आजी कोण? हे मुलीला आता मी हक्काने सांगू शकेल, असेही तिने सांगितले. आईचे निधन झाले; मात्र तिच्या आठवणी, तिचा फोटो कायम स्वतःजवळ असेल असे अनुजाने सांगितले.