जीएसटी अधिकाऱ्याकडे सापडली ६५ लाखांची बेनामी मालमत्ता; सीबीआयने केली अटक
By मनोज गडनीस | Published: January 6, 2024 07:24 PM2024-01-06T19:24:33+5:302024-01-06T19:48:09+5:30
अनेक मालमत्तांची खरेदी त्याने कुटुंबीयांच्या नावे केल्याचे सीबीआयच्या तपासात आढळून आले आहे.
मुंबई - केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या कर चुकवेगिरी पथकात उपाधीक्षक पदावर काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याकडे ६५ लाखांची बेनामी संपत्ती सापडली असून सीबीआयने छापेमारी करत त्याला अटक केली आहे. सोमेश्वर राव असे या अधिकाऱ्याचे नाव असून २०१३ ते २०२२ या कालावधीमध्ये तो नवी मुंबईत कार्यरत होता. या सेवा काळात त्याने गैर प्रकारे ही माया गोळा केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे.
करचुकवेगिरी करणाऱ्या लोकांविरोधात काम करणाऱ्या जीएसटीच्या महत्वपूर्ण विभागात सोमेश्वर राव उप-अधिक्षक म्हणून कार्यरत होता. आपल्या पदाचा गैरवापर करत त्याने ही लाखोंची माया गोळा केली आहे. यातील काही मालमत्ता त्याच्या स्वतःच्या नावावर आहेत. तर अनेक मालमत्तांची खरेदी त्याने कुटुंबीयांच्या नावे केल्याचे सीबीआयच्या तपासात आढळून आले आहे.